सेक्युलॅरिझम या शब्दाचा सध्या रूढ असलेला अर्थ म्हणजे अधर्मी, निधर्मी किंवा धर्मातीत. परंतु या शब्दांनी सेक्युलॅरिझम या शब्दातील मूळ कल्पना स्पष्ट होतच नाही, पण इहलोकवादी किंवा इहलौकिक या शब्दांनीही नीटसा अर्थबोध न होता गोंधळ माजतो.
अधर्मी, निधर्मी यांसारख्या शब्दप्रयोगांनी राज्यसंस्था स्वतःचा अधिकृत असा कोणताही धर्म मानणार नाही, इतकाच बोध होतो. राज्यसंस्थेने जरी स्वतःचा कोणताही धर्म घोषित केला नाही, तरी समाजजीवनात धर्माचे स्थान राहणारच. हा धर्म व्यक्तीच्या मनावर आपले प्रभुत्व गाजवितच राहणार. राज्यसंस्था या धर्मप्रभावाकडे दुर्लक्ष करणार की काय, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आणि इहलोकवादी राज्यसंस्था असे म्हणतानाच सरकार परलोकावर श्रद्धा ठेवण्यास मनाई करणार की काय, असेही वाटू लागते.
*****
सेक्युलॅरिझमची प्रक्रिया:
धर्माने सरंजामशाहीच्या काळात स्वीकारलेली, पुरस्कारलेली समाजरचना आणि जीवनमूल्ये या दोन्हीचाही ठसा समाजाच्या मनावरुन शक्य तितका पुसून काढणे ही सेक्युलॅरिझमची खरी प्रक्रिया आहे. मग तो कोणताही धर्म असो, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, बौद्ध, जैन, शीख, कोणताही असो, त्या सर्वांना हे लागू पडते.
परंतु आजच्या राजकारणात सेक्युलॅरिझमचा विचार नेहमी अल्पसंख्याकांच्या हितरक्षणाच्या संदर्भात होतो, हीच मुळात पहिली चूक आहे. सेक्युलर राज्यव्यवस्थेत अल्पसंख्यांकांच्या जीविताचे व हिताचे संरक्षण होत असेल, तर ती एक आनुषंगिक बाब आहे.
*****
सेक्युलॅरिझम समजून घेताना मानवी मन आणि धर्माची गुलामगिरी याचाही विचार करावा लागतो.
मुख्यतः मानवी मनाची धर्माच्या गुलामगिरीतून सुटका ३ कारणांनी होते:
१. पराभवामुळे धर्मावरच्या श्रद्धांना धक्का बसलेला असतो. येथून सर्व खळबळींना आरंभ होतो.
२. विज्ञान धर्माला मान्य नसणारी, पण नाकारता न येणारी सत्ये प्रस्थापित करते. या सत्याच्या भोवताली समाजाचे नवे हितसंबंध निर्माण होतात. या नव्या हितसंबंधांना धर्माची मान्यता नसली, म्हणजे इहलोक आणि परलोक यांचा संघर्ष सुरु होतो.
३. धर्मच धर्माच्या विरोधी झगडु लागतो.
यानंतर सेक्युलॅरिझमची प्रक्रिया अधिक सुस्पष्टपणे समजण्याच्या दिशेने आपण पुढे पाऊल टाकतो.
*****
राष्ट्रवाद:
लोकशाहीवर श्रद्धा असणाऱ्या राष्ट्राच्या गाभ्याची कल्पना एक राज्य म्हणून जगण्याची जनतेची उत्कट इच्छा ही आहे. एकत्र जगण्याची जनतेला उत्कट इच्छा असते, कारण त्यांची भाषा, धर्म, संस्कृती, परंपरा एक असतात. या अर्थाने हे सगळेच घटकावयव राष्ट्राला पूरक ठरतात.
ही एका राज्यात एकत्रपणे जगण्याची प्रबळ इच्छा हा राष्ट्रवादाचा खरा आधार असतो. म्हणून लोकशाही राष्ट्राचे संविधान जनतेच्या नावे घोषित केलेले असते. लोकशाहीप्रधान राष्ट्रातील राष्ट्रवादाचा हा आधुनिक जगातील नवा आशय लक्षात घेतला, तर राष्ट्रवाद, सेक्युलॅरिझम आणि लोकशाही या तिन्ही कल्पना सहचारी असून परस्परसापेक्ष स्पष्ट कराव्या लागतात.
*****
समान नागरिकत्व:
भारतीय संविधानाने नेमकी हीच भूमिका घेतलेली आहे. जनतेच्या नावे घोषित झालेले हे संविधान परंपरेने चालत आलेले भारत हे राष्ट्र, नव्या लोकशाहीत घोषित करीत असताना समान नागरिकत्वाच्या आधारे ते घोषित करते. भारतीय संविधानाने घोषित केलेली सर्व नागरिकांच्या समान नागरीकत्वाची कल्पना हा भारतीय लोकशाहीचाही आणि सेक्युलॅरिझमचाही मूळ आधार आहे.
शेवटी समान नागरिकत्व म्हणजे काय, याही कल्पनेची एकदा स्पष्ट शहानिशा केली पाहिजे. लोकांची सर्वसामान्यपणे अशी समजूत आहे की, भारतीय संविधानाने सर्व धर्मांना स्वातंत्र्य जाहीर केलेले आहे. सर्वसामान्य लोकांची ही समजूत घटनाकारांना, घटनेचे स्पष्टीकरण करणाऱ्या कायदेपंडितांना आणि घटनेचा अधिकृत अर्थ करणाऱ्या न्यायालयांना मान्य नाही.
भारतीय संविधानाने नागरिकांना धर्मस्वातंत्र्य दिलेले आहे, मात्र धर्मांना स्वातंत्र्य दिलेले नाही, हे आपण स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे.
धर्मांना स्वातंत्र्य आणि नागरिकांना धर्मस्वातंत्र्य या २ कल्पना परस्परांहून कायद्यात अगदी भिन्न आहेत. धर्मांना स्वातंत्र्य असले, म्हणजे धर्म आपले म्हणणे काय आहे, हे स्पष्ट करू शकतो. आमच्या संविधानाने धर्म म्हणजे काय, हे ठरविण्याचा अधिकार धर्माला दिलेला नाही, तर याबाबत सर्व अधिकार नागरिकांना देण्यात आलेले आहेत. आपण कोणत्या धर्माचे अनुयायी आहोत, हे नागरिकांनी ठरवायचे आहे. या नागरिकांना धर्म बदलण्याचा जसा हक्क आहे, तसाच कोणत्याच धर्माचे नसण्याचा हक्क आहे. नागरिकांनी कोणत्या धर्मावर श्रद्धा ठेवावी, आणि धर्माच्या कोणत्या भागावर श्रद्धा ठेवावी, ह्याचे व धर्म या कल्पनेचा कोणता अर्थ स्वीकारार्ह समजावा ह्याचे स्वातंत्र्य भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना दिलेले आहे.
स्वतंत्र कायदा करून भिन्नधर्मीय पतीपत्नींना आपापले धर्म न सोडता कायदेशीर पतिपत्नी राहण्याचा हक्क यामुळेच प्राप्त झालेला आहे. या नागरिकांच्या धर्मविषयक पूर्ण स्वातंत्र्यावर भारतीय संविधान उभे आहे. हे पूर्ण स्वातंत्र्य देऊन सर्वच नागरिकांना समान हक्क, समान अधिकार देणारे समान नागरिकत्व दिले जाऊ शकते, तसे दिलेले आहे. या समान नागरीकत्वाने हिंदूंची जातीव्यवस्था कायदेशीररित्या अवैध ठरवून बाद केली आहे आणि स्त्रियांना धर्मशास्त्राच्या विरोधी जाऊन समान अधिकार दिलेले आहेत. हे समान नागरिकत्व केवळ हिंदू धर्मशास्त्राचा छेद करत नाही, तर ते मुस्लिम धर्मशास्राचाही छेद करते.
भारतीय संविधानाने धर्माशी निगडित असणाऱ्या गर नसलेल्या इहलोकातील सर्व सार्वजनिक व्यवहारासंबंधी संसद सार्वभौम केली आहे. सर्व नागरिकांना समान नागरी व गुन्ह्यांचा कायदा निर्माण करणे हा संविधानाचा हेतू मार्गदर्शक तत्व म्हणून ४४ व्या कलमात स्वीकारण्यात आला आहे. हे ४४ वे कलम हिंदू अगर मुस्लिम किंवा कोणताही धर्म यांच्या धार्मिक कायद्यात हस्तक्षेप करण्याचा संसदेचा अधिकार-हक्कच घोषित करत नाही, तर असा हस्तक्षेप करणे, लवकरात लवकर करणे हे सरकारचे व संसदेचे कर्तव्य घोषित करते.
*****
हे सर्व लक्षात घेता, भारतीय संविधान सार्वजनिक क्षेत्रातून धर्मच निष्प्रभ करण्यास आणि व्यक्तीची व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा निर्माण करून धर्माच्या गुलामगिरीतून मानवी मन मोकळे करणे यासाठी उद्युक्त झालेले आहे, असे दिसून येईल. कारण हे केल्याशिवाय समान नागरिकत्व या कल्पनेला अर्थ नाही, समान नागरीकत्वाशिवाय लोकशाहीला अर्थ नाही.
भारतीय संविधानाने घेतलेली धर्मविषयक भूमिका नीट समजून घेऊन तीतील गृहीत कृत्ये मान्य करून जे या संविधानाला पाठिंबा देतात, ते लोकशाहीवादी असतात, सेक्युलर असतात. असा पाठिंबा न देणारे लोक कधीच सेक्युलर असू शकणार नाहीत.
भारतातील तथाकथित राष्ट्रवादी मुसलमानांच्या परंपरेने संविधानाला शाब्दिक पाठिंबा दिलेला आहे, पण संविधानातील गृहीतकृत्यांना पाठिंबा दिलेला नाही, हे आपण विसरू शकत नाही. कारण राष्ट्रवादी मुसलमानांचेही राजकारण धर्माच्या जुनाट चौकटीतूनच कार्यरत असते.
*****
वरील सर्व विवेचनातील मुख्य बाब म्हणजे, भारतीय संविधान सार्वजनिक क्षेत्रातून धर्मच निष्प्रभ करण्यास आणि व्यक्तीची व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा निर्माण करून धर्माच्या गुलामगिरीतून मानवी मन मोकळे करणे ही आहे आणि सेक्युलॅरिझमचे मूलतत्वसुद्धा हेच आहे. कारण हे केल्याशिवाय समान नागरिकत्व या कल्पनेला अर्थ नाही, समान नागरीकत्वाशिवाय लोकशाहीला अर्थ नाही. आणि त्यामुळेच सेक्युलॅरिझम या संकल्पनेला अर्थ नाही.!
*****
मी हिंदू आहे, होतो आणि राहणार, इथे आपण केवळ भारतीय संविधानातील सेक्युलॅरिझम म्हणजे काय हे समजून घेतले आहे.
- महेश पुराणिक
*****
संदर्भ : जागर (प्रा. नरहर कुरुंदकर)

No comments:
Post a Comment