दि. ८ ऑगस्ट २०१६ च्या दै. 'मुंबई तरुण भारत'च्या अंकातील माझा वेध...!!!
***
मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील ५६ मदरशांनी राज्य सरकारतर्फे दिले जाणारे माध्यान्ह भोजन नाकारण्याचा आगाऊपणा केला. ’’मदरशांतील किंवा शाळांतील विद्यार्थ्यांना दिले जाणारे अन्न आधी हिंदू देवांना नैवेद्य म्हणून दाखवले जाते, त्यामुळे पूजाअर्चा करून दिले जाणारे अन्न आम्ही खाणार नाही,’’ असा पवित्रा तेथील मदरसा प्रशासनाने घेतला. तर हे अन्न हिंदू लोक बनवत असल्यामुळे मदरशांनी ते खाण्यास नकार दिल्याचा तर्क स्थानिक प्रशासनाने लावला. माध्यान्ह पोषण आहार हा शासनाकडून मुलांची आवश्यक अन्न घटकांची गरज भागली जावी म्हणून दिला जातो. मात्र, या पोषण आहारातही आता धर्माचा मुद्दा घुसडला गेला. दहशतवादाचा धर्म ठरवणे अजून ज्या मुल्ला-मौलवींना शक्य झाले नाही, त्यांनी अन्नाला मात्र धर्माचे लेबल लावले, हे खरे तर दुर्दैवीच! उदरभरणासाठी प्रत्येक सजीवाला आवश्यक असे अन्न, त्यातही धर्माची बाब आणणे कितपत योग्य आहे? शाळा असो किंवा मदरसा यांतील मुलांचे वय पाहता त्यांना या वयातूनच धर्माधर्मात भेदभाव करायला शिकवणे सर्वथा चुकीचेच होय. आपण सर्व भारतमातेची लेकरे आहोत, आपण सर्व राष्ट्रबंधू आहोत ही भावना अजूनही काही लोकांत रुजली नसल्याचेही यातून दिसते. देशात आतापर्यंत कित्येकांनी ’हिंदू-मुस्लीमभाई भाई’ची घोषणा दिली, पण ती घोषणाही हवेतच विरल्याचे यातून स्पष्ट होते. मुस्लिमांकडून नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून आगळीक केली जाते, त्यामुळे मदरशांची ही भूमिका म्हणजे ’हमनही सुधरेंगे’चा उत्तमनमुनाच समजला पाहिजे. ’’माध्यान्ह पोषण आहारात दिले जाणारे भोजन चांगल्या प्रतीचे नसते,’’ असाही आरोप मदरसा प्रशासनाने केला. परंतु, जर तसे असेल तर मग इतर शाळांनी, त्यातील विद्यार्थ्यांनी, त्यांच्या पालकांनीही या आहाराला नकार द्यायला हवा होता, मात्र तसे झाले नाही. याचाच अर्थ या मदरसा प्रशासनाला हिंदूंनी शिजवलेला आहार नको, हेच स्पष्ट होते. त्याचबरोबर मुस्लीमधर्मियांचे भोजन वेगळ्या प्रकारचे असते, असेही बोलले जाते. पण, हे वेगळ्या प्रकारचे भोजन म्हणजे मांसाहार का? महाराष्ट्रात पुर्णान्न म्हणून विद्यार्थ्यांना अंडी दिली गेली. अंडी आता मांसाहरी समजली जात नसली तरी, मग या मुलांना नेमके काय हवे? की त्यांचा रोख बीफ वगैरेकडे आहे? हे स्पष्ट व्हायला हवे. जर तसेच असेल तर शासनाने त्याची तजवीज करावी का? तुर्तास तरी संबंधित जिल्हाधिकार्यांनी याबाबत बैठक बोलावली आहे, त्यात निश्चित काय तो निर्णय होईल.
***
यादवांची बडबड
***
यादवांची बडबड
"देशातील वाढत्या बेरोजगारीमुळे विशेष करून उत्तर भारतात श्रावण महिन्यात रस्त्यावर दिसणार्या कावडियांच्या संख्येत वाढ झाली,’’ असा अजब तर्क संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी लावला. देशातील काही तथाकथित धर्मनिरपेक्ष लोकांना हिंदूंच्या सण, उत्सव, प्रथा, परंपरांवर अधूनमधून टीका करण्याची उबळच येते, त्याचाच एक नमुना म्हणजे शरद यादवांचे हे विधान म्हणावे लागेल. ज्या देशात आपण जन्माला आलो त्या देशाच्या संस्कृतीला आणि आपल्या धर्मालाही नावे ठेवणार्या लोकांच्या मुखातून दुसरी काही अपेक्षा करता येत नाही हेही खरेच! मात्र आपण कशाबद्दल बोलत आहोत याचेही भान नसणारे राजकारणी या देशात आहेत, याची जाणीव लोकांना व्हावी म्हणून तर हे लोक असे बोलत नसतील ना, अशीही शंका यामुळे निर्माण होते. ’’जर देशात रोजगार उपलब्ध असता तर एवढ्या मोठ्या संख्येत कावडिए रस्त्यावर दिसले नसते,’’ अशी अक्कलही या महाशयांनी पाजळली. मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत मोदी सरकार सत्तेत आले परंतु, सरकारला हे आश्वासन पूर्ण करता आले नाही आणि सध्या रस्त्यावर असलेले लाखो कावडिए त्याचेच उदाहरण असल्याचे शरद यादव बडबडले. श्रावण महिन्यात हजारो हिंदू भाविक महादेवाच्या दर्शनाच्या ओढीने आपले कामधामसोडून कावड घेऊन पायपीट करतात, ते काय बेरोजगार म्हणून नव्हे. तसेच जे भाविक या कावडी घेऊन जातात तेही स्व:च्या खर्चानेच जातात. कसली सबसिडी घेऊन नाही, हेही शरद यादव विसरले असावेत. परंतु इतरांच्या धार्मिक बाबींवर बोलती बंद होणार्या शरदरावांनी इथे आपली मातीत खुपसलेली चोच बाहेर काढली आणि शिवभक्तांच्या श्रद्धेचा अपमानही केला. श्रावण महिन्यात उत्तर भारतातच नव्हे तर अगदी महाराष्ट्रातही असंख्य शिवभक्त शिवपिंडीला जलाभिषेक करण्यासाठी निघतात. अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या नोकरदार, छोटे व्यावसायिक, तरुण, शिवभक्तांचा समावेश असतो. परंतु जसे काविळ झालेल्या व्यक्तीला सगळ्या गोष्टी पिवळ्याच दिसतात, तसे हिंदूविरोधी लोकांना हिंदूंच्या सण-उत्सवात काहीतरी खोटच दिसते आणि आपली बेगडी धर्मनिरपेक्षतेची खुंटी पक्की करण्याची हुक्कीच येते. आता शिवभक्तांना बेरोजगार ठरविल्यामुळे शरद यादव यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. शिवभक्त हिंदू विविध माध्यमातून, सोशल मीडियातून शरद यादवांचा निषेध करत आहेत. पण, अजूनही त्यांनी आपले शब्द मागे घेण्याचे सौजन्य दाखवलेले नाही. इतर धर्मियांच्या बाबतीत त्यांनी असे विधान करणे शक्य नाही आणि जरी केले असते तरी शरद यादवांची पळता भुर्ई थोडी झाली असती हे मात्र नक्की. अशावेळी हिंदुंनीच संघटीतपणे आपल्या ताकदीच्या जोरावर सनदशीर मार्गाने या लोकांना त्यांची जागा दाखवून द्यायला हवी.