Saturday, 21 May 2016

स्वा. सावरकर, गौतम बुद्ध आणि बौद्धधर्म


वैशाख पौर्णिमा अर्थात गौतम बुद्ध जयंती!
आज आपण स्वा. सावरकर आणि बौद्धधर्म याविषयी काही बाबी जाणून घेणार आहोत.
*****
स्वा. सावरकरांनी बौद्ध धर्म व गौतम बुद्ध यांच्यावर टीका केली वगैरे वगैरे गैरसमज कित्येक वर्षापासून आपल्यात आहेत. तसेच त्यांचे विरोधक, अभ्यासक, अनुयायी यांनीही जाणीवपूर्वक हे गैरसमज जोपासण्यातच धन्यता मानल्याचेही आपल्याला दिसून येते.
परंतु, आज आपण स्वा. सावरकरांचे बौद्धधर्म आणि तथागत गौतम बुद्ध यांच्याविषयीचे विचार जाणून घेऊन गैरसमज दूर करणार आहोत!
*****
१. भगवान बुद्धांचा उल्लेख सावरकरांच्या साहित्यात अनेक ठिकाणी अत्यंत आदराने, कृतज्ञतेने व भक्तिभावाने केलेला आढळतो.
वयाच्या विसाव्या वर्षी लिहिलेल्या 'वंदे मातरम' या निबंधात 'महात्मा बुद्ध' असा त्यांनी गौतम बुद्धांचा उल्लेख केलेला आहे.
बौद्ध धर्मीय जपान देशाला उद्देशून सावरकर म्हणतात, "वीर्यशाली जपाना, ज्या भाग्याकरिता तू आणखी दहा सुशिमांच्या लढाया जिंकल्यास तरी तुला जे लाभणार नाही, असले बुद्ध महर्षींना जन्म देण्याचे भाग्य आमच्या आर्य वसुंधरेला आहे!"
(समग्र सावरकर वाङमय खंड ४, पृष्ठ क्र. १९)
२. हिंदुत्व या ग्रंथामध्ये सावरकर म्हणतात, "त्या बुध्दांबद्दलच्या, त्या धर्माबद्दलच्या आदराच्या, कौतुकाच्या, प्रेमाच्याबाबतीत आम्ही कोणालाही हार जाणार नाही."
(हिंदुत्व, पृष्ठ क्र. २७)
३. बौद्धधर्माच्या उदात्त तत्त्वज्ञानाचा गौरव करताना सावरकर म्हणतात, "खुद्द बौद्धधर्माची दीक्षा घेणाऱ्या भक्तांच्या मनात, अखिल जगात जो पवित्रतम संघ आहे, त्या बौद्ध संघाबद्दल जो आदर आणि जे प्रेम असेल, तेच प्रेम आणि तोच आदर बाळगणारा बौद्धधर्माचा मी एक चाहता आहे."
(हिंदुत्व, पृष्ठ क्र. ४१)
४. सावरकरांचा गौतम बुद्ध व बौद्धधर्माविषयी असलेला आदर आणि प्रेम पाहता त्यांनी मग त्या धर्माची दीक्षा का घेतली नाही असा प्रश्न निर्माण होतो. त्या विषयी सावरकर म्हणतात, "बौद्धधर्माची दीक्षा मी घेतली नाही याचे कारण, हा संघ माझ्या योग्यतेचा नाही असे नव्हे, तर मी त्या संघाच्या पवित्र मंदिरात पदार्पण करण्याला पात्र नाही हे होय."
(हिंदुत्व, पृष्ठ क्र. ४१)
५. बौद्धधर्माचे पवित्र मंदिर आजवर का टिकले हे सांगताना सावरकर म्हणतात, "हे मंदिर आजवर जे अनंत कालपर्यंत टिकले आहे, ते त्याचा पाया खडकाच्या पायावर उभारलेल्या अचिरस्थानी मोठमोठ्या राजवाड्यांच्या पायाप्रमाणे घातला नसून, तत्त्वांच्या भक्कम पायावर ते रचले गेले आहे, म्हणून होय."
(हिंदुत्व, पृष्ठ क्र. ४१)
६. शेवटी भगवान बुद्धांची क्षमा मागताना सावरकर म्हणतात, "हे तथागत! सर्व मनुष्य जातीतला मी हीन-दीन, केवळ माझी नितांत रिक्तता व माझे नितांत अज्ञान यांचाच आहेर घेऊन तुझ्याकडे येतो. जरी आपल्या बोधाचा सारांश मला आकलन करता येत नाही, असे मला वाटते, तरी मला पूर्ण खात्री आहे की, ते तसे होणेच स्वाभाविक आहे. कारण आपला उपदेश हा देवलोकीच्या वाणीतून निसृत झाला आहे; परंतु माझी श्रावनेंद्रिये आणि माझी आकलनशक्ती ही ह्या ऐहिक प्रत्यक्ष प्रमाणमय जगाचा शब्दघोष ऐकायला शिकली आहे.! ह्या जगाला आपल्या भरारीबरोबर चालता येत नाही व आपल्या दैदिप्यमान निशाणाकडे दृष्टी लावता-लावताच ती अंधुक होऊन दिपून जाते!"
(हिंदुत्व, पृष्ठ क्र. ४१)
*****
स्वा. सावरकरांना बौद्ध धर्म व गौतम बुद्ध यांच्याबद्दल अतीव आदर होता. डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्यावेळी सावरकरांनी बौद्ध धर्मावर टीका केल्याची माहिती मुद्दाम पसरवली जाते. परंतु सावरकरांनी १९३५ साली केलेली टीका ही आंबेडकर इस्लाम किंवा ख्रिस्ती धर्म स्वीकारणार असे कल्पून केलेली आहे, कारण त्यावेळी आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारणार असल्याचे कुठेही म्हटलेले नव्हते.
सावरकरांनी आंबेडकरांवर व बौद्ध धर्मांतरावर दुसरी टीका १९५६ साली केली आहे. परंतु यावेळी केलेली टीका ही बौद्ध धर्मातील महायान पंथ व त्यातील अंधश्रद्धांचा बुजबुजाट याला समोर ठेऊन केलेली आहे.
परंतु डॉ. आंबेडकरांचा 'बुद्ध अँड हिज धम्म' हा नवबौद्धमत असलेला ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर एक वर्षाने प्रकाशित झाला, त्यावेळी सावरकरांनी, "हा बौद्धधर्म नसून भिमयान आहे! भीमधर्म आहे!"
(तेजोगोल, पृष्ठ क्र. ८६, बाळाराव सावरकर)
असे उद्गार काढले! कोणतीही टीका केली नाही!
हे वास्तव समजून घेतलेच पाहिजे.
*****
तथागत महात्मा गौतम बुद्ध जयंती निमित्त वंदन!
- महेश पुराणिक

2 comments:

  1. पुराणिक जी..,

    मुळात सावरकर जी आंबेडकरांच्या धर्मांतराच्या विरोधी भूमिकेत होते . प्रसिद्ध सावरकर वादी अभ्यासक प्रा मोरे सर आंबेडकरांच्या धर्मान्तराच्या टिकेला नाहक सम्बोधतात तर राष्ट्रवादाच्या तुलनेत सावरकरां पेक्षा अम्बेडकराना जास्त राष्ट्रवादी म्हणतात.

    ReplyDelete
  2. पुराणिक जी..,

    मुळात सावरकर जी आंबेडकरांच्या धर्मांतराच्या विरोधी भूमिकेत होते . प्रसिद्ध सावरकर वादी अभ्यासक प्रा मोरे सर आंबेडकरांच्या धर्मान्तराच्या टिकेला नाहक सम्बोधतात तर राष्ट्रवादाच्या तुलनेत सावरकरां पेक्षा अम्बेडकराना जास्त राष्ट्रवादी म्हणतात.

    ReplyDelete