महाराष्ट्राचे महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी नुकतेच एक विधान केले, आणि त्यावर गदारोळ देखील झाला.
"राज्यातील शेतकर्यांच्या आत्महत्या रोखणे कठीणच" असे ते विधान होय.
राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करूनही शेतकरी आत्महत्या रोखण्यात कोणालाही यश आलेले दिसत नाहीये. आता महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्याबंदी कायदा लागू करून शेतकऱ्याला आणखी खड्ड्यात घातल्याचे देखील बोलले जात आहे. परंतु या आधी याविषयी लेख लिहून मी गोपालनातून आर्थिक उन्नतीचा मार्ग, असा लेख लिहून त्याविषयी माहिती देखील दिलेली आहे.
नुकतेच जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या ब्लोग वर एक लेख वाचला, त्यात त्यांनी भारतीय गायींच्या पालनातून आर्थिक दृष्ट्या संपन्न झालेल्या अशोक इंगवले यांच्या बद्दल माहिती दिलेली आहे. लेख आवडला त्या दृष्टीने आणखी बातम्या आणि विडीओज गोळा करण्यासाठी नेट वर शोध घेतला, एक दोन बातम्या आणि एक विडिओ एवढेच हाती लागले.
याविषयी जवळ जवळ सर्व माध्यमात बातमी येण्याची अपेक्षा होती, मात्र माध्यमांनी ती फोल ठरवली.
सातारा जिल्ह्यात माण तालुका आहे, माण तालुक्यात बिदाल नावाचे गाव आहे, तेथील अशोक इंगवले यांच्या देशी गायीच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीतून आर्थिक उन्नती व कोट्यावधी रुपये कमावण्याची ही कहाणी आहे.
महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि सरकारने अशा व्यक्तींच्या मार्गदर्शनातून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त कार्य करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून शेतकरी आत्महत्या करणार नाही.
अशोक इंगवले म्हणतात,
"शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी; पण सुरवात थोडी थोडी करावी. सेंद्रिय शेती करताना पहिल्यांदा देशी गायी घरासमोर बांधा आणि मगच सेंद्रिय शेतीला सुरवात करा. देशी गाय ही आरोग्याचे प्रतीक मानली जाते. सेंद्रिय शेती करताना शेणखताचा जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे. ही शेती करताना तुम्ही शेतीला जास्तीत जास्त वेळ द्या. शरीराने आणि मनानेही या शेतीत रमा.. तुम्हाला निश्चितपणे याचा फायदा दिसून येईल. देशी गायीच्या सान्निध्यात राहिल्यास अनेक अनुकूल परिणाम दिसून येतील. शास्त्रज्ञांनीही हे मान्य केले आहे. देशी गाय पालनासाठी अत्यंत सोपी आहे. शेतकरी जसे या गायीचे व्यवस्थापन करतील तशी ही गाय राहते. यामुळे पालनपोषणाला ही गाय सहज सुलभ आहे. शेती चॅलेंज म्हणून स्वीकारा. काही कालावधीनंतर त्याचे अनुकूल परिणाम आपोआप दिसतील."
भारतीय गायीचे मोल ब्राझिलसारख्या दक्षीण अमेरिकन देशाला उमगले असून, त्याच्यासह अनेक पुढारलेले देश भारतीय देशी गायीच्या पैदाशीच्या मागे धावत असल्याची माहिती अशोक पोटतिडकीने देतो.
कृषी पदवीधर असलेल्या अशोकने नोकरीच्या मागे न लागता स्वतःची शेती करण्याचा निर्णय घेतला, सुरुवातीला आधुनिक पद्धतीने शेती केली मात्र त्यातून तोटाच तोटा झाल्याने तो देशी गायींच्या सहाय्याने सेंद्रिय शेतीकडे वळला आणि आज कोट्यावधी रुपयांचा मालक झाला आहे. आणि हे सर्व अशोकने केले ते माण सारख्या दुष्काळी भागात, हे विशेष होय.
महाराष्ट्र आणि भारतीय शेतकऱ्यांनी जर्सी अथवा इतर परदेशी गायींच्या मागे न लागता देशी गायी पाळणेच हितकारक आहे असे यातून स्पष्टपणे दिसते आहे. सरकारने आता देशी गाय संवर्धनासाठी उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे. याविषयीची अधिक माहिती खालील विविध लिंक वरून मिळू शकेल.


No comments:
Post a Comment