Monday, 8 August 2016

क्रौर्याची परिसीमा

नगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात ’अमानुष’, ’अमानवी’, ’माणुसकीला काळिमा फासणारी’ हे शब्द सुद्धा जिथे तोकडे पडतील अशी बलात्काराची नृशंस घटना १३ जुलैच्या रात्री घडली असून त्यामुळे खळबळ माजली आहे. नववीत शिकणार्‍या श्रद्धा या अल्पवयीन मुलीवर जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे व इतरांनी अगणित अत्याचार करत संपूर्ण शरीराला रानटी कुत्र्यासारखे चावे घेत, लचके तोडत गुप्तांग व शरीराची विटंबना केली. तिचे दोन्ही हात मोडून, मान पिरगळून बलात्कार करून तिची हत्या केली. आता यातील दोन आरोपींना अटकही झाली आहे, हे ठीकच. पण, अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना केवळ कर्जतसारख्या लहान तालुक्यातील खेड्यात घडली म्हणून याकडे दुर्लक्ष करणार्‍यांनी आणि या घटनेला जातीच्या दृष्टीकोनातून पाहणार्‍या महाभागांनी खरे तर आपली बुद्धी तपासून घेतली पाहिजे. हा अत्याचार एका मुलीवर झाला आहे, हे या ठिकाणी महत्त्वाचे नाही का? या घटनेनंतर उठसूट कुठल्याही फुटकळ गोष्टीवर राजकीय फायद्यासाठी आंदोलन करणारे फुले, शाहू, आंबेडकरांचे वारस म्हणवणारे लोक मात्र गिळून गप्प बसले आहेत. अर्थात येथे पीडित आणि आरोपीची जात-धर्म वेगळा असला असता तर हा राष्ट्रीय प्रश्न झाला असता, साहित्यिकांनी पुरस्कार वगैरे परत केले असते, कोणीतरी असहिष्णुता वगैरेची भंकसगिरी केली असती, कोणीतरी माझे कुटुंबीय देश सोडण्याची गोष्ट करत आहे, असे म्हणाले असते. येथे जात-धर्माचा विचार करुन मृत्यूनंतरही पीडितेची विटंबना करणे घृणास्पद नाही का, याचाही विचार करणे आवश्यक झाले आहे. तसेच या घटनेची म्हणावी तशी तत्काळ दखल कोणत्याही मुख्य प्रवाहातील माध्यमांनी घेतली नाही, हेही खेदजनक आहे.
सदर घटनेची सोशल मीडियात प्रचंड चर्चा होत असताना एका असहाय्य मुलीवर अमानुष अत्याचार झाला, तिला न्याय देण्याची गरज आहे, अशी भूमिका घेणे यावेळी गरजेचे झाले आहे. केवळ निषेधाचे खलिते आणि बोलघेवडेपणा सोडून ठोस कृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा सामान्य नागरिकांच्या भावनांचा आगडोंब उसळून त्या वणव्यात सर्व यंत्रणा अस्ताव्यस्त होण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर नगर, बीडसह ठिकठिकाणी बंद पाळण्यात येत आहे, आंदोलन केले जात आहे. पालकमंत्री रामशिंदे यांनीही घटनेची माहिती घेत पीडितेच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले आणि गृहराज्यमंत्र्यांनीही पीडित कुटुंबाची भेट घेतली. आता याचा राजकीय फायदा घेण्यासाठी इतर राजकारणीही तिकडे जात आहेत. परंतु, यामुळे स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आणि या घटनेला जातीयवादाची किनारही लाभली. त्याचबरोबर, आतापर्यंत जवखेडा, नेवासे, येथील व्यक्तींवर अत्याचार झाल्यावर त्याला दलित विरुद्ध सवर्ण असा जो जातीयवादी रंग दिला गेला, ते अतिशय वाईट होतेे. अशा प्रकारे एखादा गुन्हा जातीच्या चष्म्यातून पाहणे, त्यावर जातीविरुद्ध जाती अशी चर्चा घडवून आणणे, हे खरे तर दुर्दैवी आहे. कायद्याचे राज्य या संकल्पनेचे आतापर्यंतच्या राजवटींनी कसे तीनतेरा वाजवले आहेत तेही यातून लक्षात येत आहे. कारण केवळ कठोर कायदे करून प्रश्न, समस्या निकाली निघत नसतात. मुलीवर ती असहाय आहे म्हणून बलात्कार होत नाही तर तिचे संरक्षण करण्याची हमी दिलेला कायदा तोकडा पडला म्हणून त्या समाजातल्या महिलांना बलात्काराचे बळी व्हावे लागत असते. शारीरिक इजा महिलेला-मुलीला होते. पण त्याहीपेक्षा मोठी हानी कायद्यावरील विश्वासाला होत असते, हेही लक्षात घेण्याची गरज आहे.
निर्भयाकांडातील आरोपींचे ज्याप्रकारे अल्पवयीन वगैरे म्हणत फाजील लाड केले गेले, मानवाधिकाराचे नाव घेत शिक्षेविरोधात मत मांडले गेले, ते अत्यंत चुकीचे आणि निर्दयी होते, तसे यावेळी तरी होऊ नये हीच अपेक्षा. ज्या व्यक्तीवर एखादा अत्याचाराचा प्रसंग गुदरला त्या व्यक्तीलाही मानवाधिकार असतो हे विसरून आरोपीच्या बचावासाठी मानवाधिकार उभा राहतो त्यावेळी कायद्याचा धाक, त्याची अंमलबजावणी, न्यायाची मागणी या गोष्टींना कसलाही अर्थ राहत नाही. त्याचवेळी या घटनेतील गुन्हेगाराच्या क्रूर आणि अमानुष मानसिकतेचा विचार केल्यास मी पुरुष आहे आणि माझ्या सुखासाठी मी काहीही करू शकतो ही जी प्रवृत्ती दिसून आली ती खरे तर विकृती आहे. स्त्री ही केवळ उपभोग्य वस्तू आहे, असे समजण्याची जी विकृत प्रवृत्ती आहे, त्यातून या अशा घटना घडत असतात, स्त्रीया बळी पडत असतात. ही विकृती एखाद्या पुरुषाला कोणत्याही वयाच्या स्त्रीवर अत्याचार करण्यास प्रवृत्त करते. गुन्हा करताना ही पुरुषी मानसिकता विकृत रूपात वावरत असते. तर ही मानसिक विकृती कशी कृतीशून्य करता येईल, याचाही विचार करणे अगत्याचे झाले आहे. यामुळे मानवाधिकार वगैरे गोष्टींचा बाऊ न करता कठोरातील कठोर निर्णय घेण्याची, बलात्कारासारख्या गुन्ह्यातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देण्याची गरज निर्माण झाली आहे..!!
- महेश पुराणिक

No comments:

Post a Comment