Monday, 8 August 2016

देशविरोधकांना इशारा

दि. १ ऑगस्टच्या दै. 'मुंबई तरुण भारत'च्या अंकातील माझा वेध...!!!
***
श्रीनगर किंवा दिल्लीत बसून देशाविरोधात, देशाचा अपमान होईल, असे बोलण्याची काही लोक हिंमत करतात. अशा लोकांना कोणाचे तरी पाठबळ असल्याशिवाय हे शक्य नाही, असे सुनावत देशाविरोधात बोलणार्‍यांना एखाद्या अभिनेता वा ऑनलाइन ट्रेडिंग कंपनीप्रमाणेच धडा शिकवायला हवा, असे स्पष्ट मत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी शनिवारी व्यक्त केले. खरे म्हणजे अशा प्रकारे देशाविरोधात बोलणार्‍यांना कडक शब्दांत खडसावण्याची नितांत आवश्यकता होती. संरक्षणमंत्र्यांनी तेच केले आहे.
बुरहान वानी या अतिरेक्याला लष्कराने कंठस्नान घातल्यानंतर काश्मिरात हिंसाचार उसळला होता. यावेळी लष्कराने बुरहानचे समर्थन करणार्‍या आंदोलकांवर पेलेट गन्सचा वापर केला होता. यावरही अनेकांनी टीका केली होती. याचादेखील समाचार घेत पर्रिकरांनी, देशाच्या एखाद्या भागात लष्कराला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नेमले असताना त्यामध्ये इतरांनी लुडबुड करण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले. तसेच शस्त्रे कशी वापरावीत हे भारतीय सैन्याला शिकविण्याची गरज नसल्याचे सांगत जशास तसे उत्तर देण्याचा आपला इरादाही स्पष्ट केला. संरक्षणमंत्र्यांनी लष्कराचे मनोबल वाढवत, आपल्या देशाचे सैन्यदल बलशाली असून प्रत्येक भारतीयाला त्याचा अभिमान असल्याचे सांगितले. सैन्यातील जवानांना केवळ सरकारचे नोकर समजणार्‍यांना आणि जवान केवळ मरण्यासाठीच सीमेवर तैनात असल्याचे निर्लज्ज विधान करणार्‍यांना चपराक लगावत सैनिक हे देशाचे रक्षणकर्ते असल्याचेही त्यांनी सांगितले. लष्कर कार्यरत असताना सैनिकांवर कोणी हल्ला केल्यास त्याला प्रत्त्युतर द्यावेच लागेल, याला विरोध करण्याची आवश्यकता नाही, असे म्हणत देशविघातक शक्तींचा पुळका आलेल्या तथाकथित मानवतावाद्यांनाही ठणकावले. त्याचबरोबर
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आमिर खानने देशातील वाढत्या असहिष्णुतेचा उल्लेख करत आपल्या पत्नीच्या मनात देश सोडण्याचे विचार घोळत असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरही टीकेची झोड उठली होती. तसेच तो ज्या ऑनलाइन ट्रेडिंग कंपनीची जाहिरात करत होता, त्या कंपनीवरही अनेकांनी बहिष्कार टाकला होता. पर्रिकरांनी आमिर आणि स्नॅपडील या ऑनलाइन ट्रेडिंग कंपनीचा नामोल्लेख टाळत देशाविरोधात बोलणार्‍यांना धडा शिकवण्याचा इशारा दिला, हेही चांगले झाले. आपण प्रसिद्ध व्यक्ती झालो म्हणजे आपल्याला काहीही बरळण्याचा अधिकार प्राप्त झाला असे समजणार्‍यांना त्यांची जागा दाखवून देणेही आवश्यक होते, तेच यातून साधले आहे.
****
समरसतेचा सूर
प्रसिद्ध कर्नाटकी शास्त्रीय गायक थोडूर कृष्णा व सफाई कामगारांच्या हक्कांसाठी चळवळ उभारणारे बेजवाडा विल्सन यांना नुकताच प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला. बेजवाडा विल्सन यांनी देशाच्य अनेक भागात डोक्यावरून मैला वाहून नेण्याच्या कुप्रथेविरोधात लढा देत चळवळ उभारली होती. त्यांच्या याच कार्याची दखल घेत ’मॅगसेसे’साठी त्यांची निवड झाली. ’प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेने जगण्याच्या अधिकारासाठी लढणारा कार्यकर्ता’ अशा शब्दांत ’मॅगसेसे’ने विल्सन यांचा गौरव केला.विल्सन यांच्याव्यतिरिक्त १९७६ साली चेन्नईत जन्मलेल्या आणि शास्त्रीय संगीतात रमलेल्या, गायक थोडूर कृष्णा यांनी संगीतक्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखलही या पुरस्कार समितीने घेतली. कृष्णा यांनी शास्त्रीय संगीताला केवळ गानमैफिलींपुरते मर्यादित न ठेवता त्या माध्यमातून सामाजिक विषमता दूर करत सामाजिक समरसतेसाठी उल्लेखनीय कार्य केले. आपल्या गायनकलेच्या सामर्थ्यातून त्यांनी शास्त्रीय संगीत तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवले. देशातील अभिजात संगीतामध्ये हिंदूस्थानी शास्त्रीय संगीत व कर्नाटकी शास्त्रीय संगीत असे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. याच संगीत प्रकार परंपरेतील कर्नाटकी शास्त्रीय संगीत शिकून त्याद्वारे आपले आणि इतरांचे आयुष्य बदलवण्याचे, सुरमय करण्याचे ध्येय त्यांनी ठेवले. अर्थशास्त्राची पदवी प्राप्त केलेली असूनही कृष्णा यांनी संगीतक्षेत्रातच कारकीर्द करायची खूणगाठ मनाशी बांधली. वयाच्या विसाव्या वर्षीच कृष्णा हे पूर्णवेळ गायकीच्या क्षेत्रात उतरले. दमदार आवाज लाभलेला हा गायक अल्पावधीतच लोकप्रिय झाला. शास्त्रीय संगीतही अतिशय सुगमपणे सादर करण्याची कलाही त्यांना अवगत झाली. म्हणूनच, त्यांचे गाणे हे केवळ उच्चभूंच्या दिवाणखान्यापुरते मर्यादित न राहता समाजाच्या सर्व थरांत पोहोचले. या गाण्याने समाजातील विषमता दूर होण्यास मदत झाली. त्यांच्या याच संगीतसेवेचा गौरव करताना मॅगसेसेने नेमकी हीच बाब अधोरेखित केली. संगीताकडे अनेकजण केवळ श्रवणानंदाची बाब म्हणुन पाहतात. परंतू, संगीताकडे सामाजिक वास्तवाची बाब म्हणुनही पाहायला हवे, हे कृष्णा यांनी प्रत्यक्ष आपल्या कृतीतून आणि गायकीतून दाखवून दिले. त्यांच्या ’ए सदर्न म्युझिक, द कर्नाटक स्टोरी’ या पुस्तकातही याचा उहापोह करण्यात आला आहे. कृष्णा यांनी संगीतक्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले, ही बाब अत्यंत स्पृहणीय अशीच म्हणावी लागेल. यातून समरसतेचा स्वर नेहमीच ऐकू येईल हे नक्की. या दोघांचेही अभिनंदन.
- महेश पुराणिक

No comments:

Post a Comment