Monday, 8 August 2016

...यांना आवरा


‘हिजबुल मुजाहिदीन‘ या कुख्यात दहशतवादी संघटनेचा ’पोस्टर बॉय’ म्हणून ओळखला जाणारा अतिरेकी बुरहान मुझफ्फर वानी याला भारतीय जवानांनी कंठस्नान घातल्याने खोर्यातील वातावरण कमालीचे तापले आहे. वानीच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या बेफामतरुणांनी ‘इसिस‘चे झेंडे फडकावत सुरक्षा चौक्या, पोलीस ठाणी, सरकारी कार्यालये आणि भाजप कार्यालयाला लक्ष्य केले. उसळलेल्या जमावामुळे झालेल्या हिंसाचारात २० जण ठार, तर शेकडोजण जखमी झाले, ज्यामुळे खोर्यात संचारबंदी लागू करण्यात आली. या पार्श्वभूमीवर नागरिकांना अतिरेक्यांप्रति वाटत असलेली सहानुभूती हा चिंतेचा विषय झाला आहे. कारण बुरहान वानी हा काही कोणी फार मोठा समाजसेवक किंवा राजकीय नेता नव्हता, तर दहशतवादी कृत्यात बुडालेला, कित्येक निरपराध नागरिकांची हत्या करणारा क्रूरकर्मा होता. तरीही त्याच्या अंत्ययात्रेला तब्बल ४० हजार नागरिकांनी गर्दी करत सहानुभूती दाखवली, ही दुर्दैवी गोष्ट आहे. काश्मीरमधील तरुणांची माथी भडकावणे, त्यांना भारताविरुद्ध चिथावणे असले उद्योग करणार्या फुटीरतावाद्यांमुळे अशा घटना घडत आहेत, त्याचबरोबर ‘इसिस‘चा खोर्यात प्रवेश झाल्याचेही यातून दिसत आहे. सय्यद गिलानी, मिरवाईज फारुख, मोहम्मद यासीन मलिक, या लोकांमुळे काश्मिरी तरुण विधायक कार्याऐवजी देशविरोधी कारवायात सहभागी होत आहेत, याला आळा घालणे अत्यावश्यक बनले आहे. पाकिस्ताननेदेखील बुरहान वानीच्या खात्म्यानंतर भारत काश्मिरी लोकांवर अन्याय करत असून ही हत्या न्यायालयाच्या अधिकार कक्षेबाहेरील असल्याचे म्हणत काश्मिरी नागरिकांना भडकाविण्याचा उद्योग केला आहे. काश्मीर खोर्यात कधी, कोणत्या कारणाने तणाव निर्माण होऊन त्याचे पर्यवसान दगडफेक, जाळपोळीत होईल, हे सांगणे नेहमीच अवघड असते. मात्र, फुटीरतावादी शक्ती व सीमेपलीकडून सोशल मीडियावरून चालणारा देशविरोधी प्रचार तरुणांच्या अस्वस्थ मानसिकतेला खतपाणी घालतो, ज्यामुळे कित्येक काश्मिरी तरुणांचे घोळके घोषणाबाजी करत खुलेआमसुरक्षा दले व सामान्य नागरिकांना लक्ष्य करतात. परंतु, आताचा हा धुडगूस, अंत्ययात्रेतील गर्दी, हिंसाचार हा प्रकार पाहता काश्मिरी तरुणांच्या मनात देशविरोधी शक्तींनी कसले विष कालवले आहे, हे दिसून येते. यामुळे दहशतवाद्यांविरुद्ध केल्या जाणार्या कारवाईत अडथळे निर्माण होत आहेत, यासाठी अशा प्रकारांना वेळीच आवर घालण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
***
स्थानिकांशी मैत्री
भारतीय लष्कर आणि केंद्र व राज्य सरकार आपापल्या परीने जम्मू-काश्मीरमधील स्थानिक जनतेशी सौहार्दाचे व मैत्रीचे संबंध दृढ करण्यावर भर देत आहेत. भाजप-पीडीपी सरकारमुळे स्थानिक क्षेत्राचा विकासही होत आहे. सरकारचे प्रयत्न सुरूच आहेत, मात्र याचवेळी कोणत्याही स्थितीचा गैरफायदा घेणार्या सीमेपलीकडील शक्ती, ‘इसिस,‘ फुटीरतावादी गट आणि त्यांच्या नेत्यांना वेसण घालणेदेखील गरजेचे झाले आहे. काश्मीरातील हिंसाचारानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय पातळीवरूनही हालचाली करण्यात आल्या. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील या हिंसाचारानंतर स्थानिक नागरिकांना संयमबाळगण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केलेले आहे. तसेच हिंसेमध्ये सहभागी होऊ नये, असेही म्हटले आहे. हिंसाचारानंतर पवित्र अमरनाथ यात्रादेखील थांबवण्यात आली आहे. संपूर्ण देशभरात दहशतवादी आणि फुटीरतावादी शक्तींविरुद्ध सामान्य नागरिकांत रोषाचे वातावरण असताना मात्र राजदीप सरदेसाई या पत्रकाराने बुरहान वानीची तुलना थोर क्रांतिकारक भगतसिंग यांच्याशी केली, तर जेएनयुतील देशद्रोही घोषणांच्या आरोपात अडकलेल्या उमर खालिदने वानीचे समर्थन करत त्याला क्रांतिकारक म्हटले, तसेच स्वतंत्र काश्मीरचा रागही आळवला. या दोघांनीही वानीला हुतात्मा ठरविण्याचा जो अश्लाघ्य प्रकार केला, तो निश्चितच संतापजनक असून शेकडो हुतात्म्यांचा आणि भारतीय जवानांचा अपमान करणारा आहे, त्यामुळे अशा प्रवृत्तींचा तातडीने बिमोड करणे आवश्यक आहे. साम्यवादी विचारसरणीत वाढलेल्या उमरसाख्यांना देशाप्रती प्रेमाची भावना असण्यापेक्षा आगीत तेल ओतून ती जास्त भडकावणेच महत्त्वाचे वाटत असावे. अशा प्रकारच्या विषवल्ली देशात वाढत असताना यांना ठेचायलाच हवे. अशा लोकांमुळे स्थानिक नागरिक आणि उर्वरित देशातील नागरिक यांच्यातील विश्वास कमी होऊ शकतो. त्याचवेळी केवळ सहानुभूतीच नाही, तर दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ लढण्यास जी मंडळी पुढे सरसावत आहेत, त्यामुळे स्थानिक नागरिकांशी मैत्रीसंबंध दृढ करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना मात्र धक्का लागता कामा नये, हेदेखील लक्षात घेणे तेवढेच आवश्यक आहे. तसेच काश्मीरला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी सरकारने दहशतवादाशी तडजोड न करता आपला लढा सुरूच ठेवण्याचीही गरज आहे. या सर्व प्रयत्नात उर्वरित देशवासीयही काश्मिरी जनता आणि लष्कराबरोबरच असतील, हे नक्की.

No comments:

Post a Comment