Monday, 19 September 2016

डाव्यांच्या ढोंगबाजीचा वस्तुनिष्ठ पंचनामा

दि. २१ ऑगस्ट २०१६ च्या दै. 'मुंबई तरुण भारत'मधील मी केलेले पुस्तक परीक्षण...!!!
***
भाकपच्या मित्रपक्षांनीही मागे हटावे, असा भयानक हिंसाचार येथे घडला होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अंदाधुंद गोळीबार करत नंदीग्राम परिसरात गावांमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर लुटालूट व जाळपोळ केली. एका घटनेत माकपच्या कार्यकर्त्यांनी मध्ययुगीन लढाईप्रमाणे भव्य विजयी मिरवणूक काढली व पुढच्या बाजूला दोरखंडाने बांधलेले भूमी उच्छेद प्रतिरोध कमिटीचे ५०० बंदिवान मानवी ढाल म्हणून वापरले. त्यानंतर हिंसाचाराच्या घटना घडत राहिल्या व त्यामध्ये अनेकजण ठार व जखमी झाले. एके ४७ प्रणालीच्या रायफल्स आणि बॉम्बचा वापर करून या कार्यकर्त्यांनी हिंसाचार केला. प्रत्येकी १०० जणांच्या त्यांच्या बटालियनमध्ये बांकुला व दक्षिण परगणा जिल्ह्यातील गुन्हेगार व दरोडेखोर होते. त्यांना ‘ऑपरेशन नंदीग्राम’साठी आधीच सुपारी दिली होती.’’
अंगाचा थरकाप उडवणारे हे भयानक वर्णन आहे पश्चिम बंगालमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सत्ताकाळातील नंदीग्राम आंदोलनातील अत्याचाराचे आणि दंडुकेशाहीचे. भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते माधव भांडारी यांच्या ’डाव्यांची ढोंगबाजी : भ्रष्टाचार, हिंसाचार आणि दंडुकेशाही’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकात ठिकठिकाणी डाव्यांच्या पाखंडीपणाचे, क्रूरतेचे आणि दडपशाहीचे संदर्भासहित वर्णन आले आहे. त्यातीलच ’डाव्यांची ढोंगबाजी : दिखाऊ कळवळा’ या प्रकरणातील हा उतारा आहे. विविध घटना, प्रसंग, आकडेवारी, संदर्भ यांच्या माध्यमातून डाव्यांच्या तथाकथित पुरोगामी, लोकशाहीवादी आणि उदार विचारसरणीचा पर्दाफाश या पुस्तकात लेखकाने केला आहे. भ्रष्टाचार आणि हिंसाचार हे डाव्यांचे खरे रूप असले, तरी प्रसिद्धी माध्यमांमधील वर्चस्वाच्या जोरावर त्यांनी आपला बुरखा कधी फाटू दिला नाही आणि आपले वास्तव रूप जनतेसमोर येऊ दिले नाही. तसेच, डाव्यांच्या घृणास्पद आणि गलिच्छ राजकारणाची चिकित्सा भारतात आतापर्यंत कोणीही व्यापक प्रमाणात केली नाही आणि याचाच फायदा घेत ही मंडळी आपली कृष्णकृत्ये करत राहिली. परंतु, आता डाव्यांच्या या काळ्या कृत्यांचे खरे स्वरूप देशासमोर, समाजासमोर येणे अत्यावश्यक झाले आहे. अशा काळात हे पुस्तक प्रसिद्ध झाल्याने डाव्या चळवळी, त्यांच्या निष्ठा, नक्षलवाद, माओवाद यांना असलेला त्यांचा कधी उघड, तर कधी छुपा पाठिंबा या पुस्तकातून जगासमोर मांडण्याचे महत्त्वाचे कार्य झाले आहे.
माधव भांडारी यांना राजकीय रणनीतीकार, विश्लेषक-भाष्यकार, प्रभावी वक्ता आणि तळागाळातील ग्रामीण जनतेशी नाळ जोडलेला कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाते. अत्यंत आक्रमकपणे, परंतु मुद्देसूदपणे भारतीय जनता पक्षाची बाजू मांडण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील खडाजंगी चर्चेत त्यांनी ठामपणे पक्षाचा बचाव केला आहे. सार्वजनिक ठिकाणीदेखील ते पक्षाची भूमिका सातत्याने मांडत असतात. भाजपसाठी वैचारिक आघाडीवर कामकरतानाच त्यांचा पक्षसंघटनेशी व लहान-मोठ्या कार्यकर्त्यांशीही घनिष्ठ संबंध आहे. एवढेच नव्हे, तर राजकीय क्षेत्रात कामकरतानाच त्यांनी पत्रकारिता व प्रभावी ठसा उमटवला आहे. त्यांनी राजकारण व वैचारिकदृष्ट्या महत्त्वाची अशी अनेक पुस्तके लिहिली आहेत. यापैकी ’बोफोर्स-देश विकायला निघालेले राज्यकर्ते,’ ’पंचायत राज,’ ’वंदे मातरम्,’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.
भारतातील डावी चळवळ म्हणजे एका बाजूला कॉंग्रेसचा असलेला राजाश्रय, दुसर्‍या बाजूला अंगावर पांघरलेली भंपक पुरोगामीपणाची झूल, तिसर्‍या बाजूला शैक्षणिक-संस्थात्मक आणि प्रसारमाध्यमविश्वावरील पकड आणि चौथ्या बाजूला अन्य कोणताही वेगळा विचार मांडणार्‍यांच्या हकालपट्टीसाठी राजकीय, वैचारिक, कंपूशाहीजन्य अस्पृश्यतेचा मन:पूत वापर होय. याचबरोबर डाव्या मंडळींनी लोककल्याणाच्या नावाखाली ज्या ज्या राज्यात त्यांची सरकारे होती, तिथे तिथे आर्थिक भ्रष्टाचार करत, सर्व प्रकारचा हिंसाचार माजवत आणि वैचारिक अस्पृश्यतेचा वापर करत दंडुकेशाहीच्या बळावर आपली राजवट निर्लज्जपणे राबविली. याचाच समाचार आपल्या पुस्तकात माधव भांडारी यांनी अतिशय मुद्देसूदपणे घेतला आहे.
भारतात डाव्यांना आतापर्यंत कधीही स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही. केवळ पश्चिमबंगाल, केरळ, त्रिपुरा यासारख्या राज्यात डाव्यांनी सत्ता प्राप्त केली. आपली विचारसरणी या देशात रुजणार नाही आणि त्यामुळे लोकशाही मार्गाने लोकांच्या पाठिंब्यावर आपली सत्ताही येणार नाही हे डाव्या मंडळींना कळून चुकल्याने या लोकांनी अन्य ठिकाणे हस्तगत करून तिथे आपले बस्तान बसवले. शिक्षण, कामगार व वृत्तपत्र क्षेत्रात घुसखोरी करून या लोकांनी ही क्षेत्रे आपल्या ताब्यात घेतली आणि त्यातून आपला विखारी प्रचार सुरू केला व ही क्षेत्रे दूषित केली. आजही या क्षेत्रात याच मंडळींचा वरचष्मा असल्याचे दिसते; परंतु, केवळ कॉंग्रेसच्या वळचणीला गेलेल्या या लोकांना लोकाश्रय कधी मिळू शकला नाही हेही तितकेच खरे आहे.
’भ्रष्टाचाराचा ढोंगी विरोध’ आणि ’भ्रष्टाचाराचे वास्तव’ या दोन प्रकरणांत लेखकाने डाव्यांच्या पाखंडाचे विवेचन केले आहे. त्रिपुराचे कम्युनिस्ट मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या साधेपणाचे वर्णन, देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री, असे केले जाते; परंतु याच सरकारच्या कार्यकाळात राज्यात झालेली भ्रष्टाचाराची शेकडो प्रकरणे सोयीस्कररित्या दाबून टाकली जातात, तेव्हा मात्र संशय निर्माण होतो. राज्यात राष्ट्रीय आरोग्य योजनेंतर्गत २४ कोटींचा भ्रष्टाचार झाला, तर राज्यातील दहा हजार, ३२३ शिक्षकभरती प्रकरणी त्रिपुरा उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे कान उपटले. याव्यतिरिक्त इतरही अनेक योजनांत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला, याची माहिती या पुस्तकात आपल्याला मिळते. तथाकथित डाव्या विद्वानांनी इतिहास संशोधनाच्या नावाखाली कशा प्रकारे सरकारी पैशांची नासाडी केली आणि वर्षानुवर्षे प्रकल्प रेंगाळत ठेवत सरकारी सुविधांचा उपभोग घेतला, हेदेखील यात तपशिलाने सांगितले आहे. कितीतरी प्रकल्प तर अजूनही अपूर्णावस्थेत आहेत, पण याची या लोकांना ना लाज ना खंत.
हिंसाचार हा तर डाव्या विचाराचा गाभाच समजाला जातो. याच हिंसाचाराचे सत्य त्याच पक्षाचे एक नेते एम. एम. मणी कबूल करतात. केरळमध्ये कित्येक विरोधी विचारांच्या कार्यकर्त्यांच्या कधी बंदुकीच्या गोळीने, कधी चाकूने भोसकून, तर कधी मरेस्तोवर बदडून हत्या करण्यात आल्या. भाजप आणि संघाच्या अनेक स्वयंसेवकांच्या हत्या करण्यासाठी सुपारीबहाद्दर गटांचीदेखील मदत घेण्यात आली. या घटनाही पुस्तकात मांडल्या आहेत. लोकशाही प्रक्रिया डाव्यांना मान्य नाहीच; परंतु सध्याच्या काळात ते ती मान्य असल्याचे दाखवतात. पण, त्यांची हीच दांभिकता जयकृष्णन मास्टरप्रकरणी उलगडून दाखवली आहे.
’डाव्यांच्या हिंसाचाराचा उग्र चेहरा : नक्षलवाद’ या प्रकरणात डाव्यांच्या हिडीस आणि अमानवी, हिंसक वृत्तीचे वर्णन आले आहे. नक्षलवादाच्या नावाखाली देशाच्या छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशा राज्यात जो काही नंगानाच घातला जात आहे, त्याला डाव्यांचा पाठिंबा आहे. कारण डाव्यांनी कधीही या चळवळीचा विरोध अथवा निषेध केला नाही. देशभरात आतापर्यंत नक्षलवादी हल्ल्यात हजारो नागरिक आणि लष्करी जवान मृत्युमुखी पडले, पण डाव्यांनी याविरोधात कधी लेख लिहिला नाही की, चर्चा केली नाही. दुर्गम, डोंगराळ वनवासी भागातील वनवासींना, त्यांच्या मुलांना, मुलींना नक्षलवादी, माओवादी आपल्या ताब्यात घेऊन मनुष्यबळ वाढवतात. हे सर्व डाव्यांच्या आशीर्वादानेच घडते, याचा उल्लेख या प्रकरणात आलेला आहे. अनेक आकडेवारीच्या साहय्याने लेखकाने माओवाद्यांच्या हिंसक कारवाया आणि हल्ल्यांचा लेखाजोखा मांडला आहे.
’राजकीय हिंसाचाराचे मूळ’ या प्रकरणात डावे लोक संघ आणि भाजपला दोषी ठरविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच भाजपची होत असलेली घोडदौड पाहून ती आपल्या मुळावर आल्याचे लक्षात आल्यामुळे कॉंग्रेस आणि डावे कसे संधिसाधूपणाचे राजकारण खेळत आहेत यावर प्रकाश टाकला आहे. डाव्यांची ढोंगी देशभक्ती तशी सर्वश्रुत आहेच. पण पुरोगामित्वाचा मुखवटा घातलेल्या माध्यमयंत्रणांनी हे सत्य कधी जोरकसपणे जनतेसमोर येऊ दिले नाही हेही सत्य आहे. ’देशभक्तीशी तडजोड’ या प्रकरणात डाव्या मंडळींनी आपल्या स्थापनेपासून, स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात आपली राष्ट्रनिष्ठा कशी देशविरोधकांप्रती दाखवली हे सांगितले आहे. डाव्यांची देशभक्ती सुरुवातीला रशियाच्या आणि आता चीनच्या पायाखाली लोळण घेत असते. याचा अनुभव १९६२च्या चीन युद्धावेळी देशाला आलाच आहे. आताही कन्हैया कुमार या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या कारवायांना डाव्यांचा असलेला भरघोस पाठिंबा पाहता त्यांची देशाशी प्रतारणा करण्याची वृत्ती अजूनही कायमच असल्याचे दिसले. कारण न्यायालयाचा निकाल संपूर्णपणे न वाचता केवळ ‘कन्हैयाला मुक्त करा,’ एवढाच धोशा लावलेल्या डाव्यांनी त्याने दिलेल्या देशद्रोही घोषणांविषयी एक ‘ब्र’ही काढला नाही. यावरूनच जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही या म्हणीचा डाव्यांबाबत वास्तववादी प्रत्यय आल्याचे दिसले.
सदर पुस्तकातीस शेवडचा लेख ’कम्युनिस्टांच्या कुटिल कारवाया’ हा रवींद्र साठे यांनी लिहिलेला आहे. या लेखात डाव्यांचा देशाच्या फाळणीला असलेला पाठिंबा, बॅ. जीनांचे समर्थन, चीनच्या चरणी माथा टेकवलेले डावे, मुस्लीममतांसाठी लाचार झालेले डावे आणि भारत हे एक राष्ट्र आहे, या सिद्धांताला नाकारणारे डावे यांची कुंडली मांडली आहे. तसेच डाव्या विचारवंतांनीच डाव्यांच्या नाशाचा दिलेला इशाराही या लेखात आला आहे; परंतु, आपल्या हातांनीच स्वत:ची कबर खोदण्यात मग्न असलेले डावे हे समजून घेण्याची सुतरामशक्यता नाही. डावी मंडळी म्हणजे आपले सैद्धांतिक अपयश लपविण्याकरिता देशाच्या एकात्मतेशी, येथील भावविश्वशी क्रूर खेळ खेळणारी जमात होय. आज जगात सर्वच देशात साम्यवादावा पराभव पत्करावा लागला आहे, पण आपल्याच तथाकथित कल्याणकारी तत्त्वज्ञानात रमणार्‍या या मंडळींचा यावर विश्वास नाही किंवा त्यांच्यात सत्य स्वीकारण्याचे धैर्य नाही, हे नक्की, असा आशय या लेखातून व्यक्त होतो.
लेखकाने आपल्या ओघवत्या भाषाशैलीत सदर पुस्तकात डाव्यांच्या ढोंगबाजीचे संदर्भासहित दर्शन घडवले आहे. पुस्तकाची अक्षरजुळणीदेखील उत्तमआहे. ’डाव्यांची ढोंगबाजी : भ्रष्टाचार, हिंसाचार आणि दंडुकेशाही’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा येथे उल्लेख करणे आवश्यकच आहे. कारण, शोषित, कामगार, शेतकरी जनतेचा कैवारी म्हणवून घेणार्‍या डाव्यांनी स्वत:च जनतेचे शोषण करून ठिकठिकाणी त्यांचा बळी घेतला आहे, आणि याच ‘लाल सत्या’चे चित्रण अगदी समर्पक अशा मुखपृष्ठाद्वारे केले आहे.
पुस्तकाचे नाव : ‘डाव्यांची ढोंगबाजी : भ्रष्टाचार, हिंसाचार आणि दंडुकेशाही’
लेखक : माधव भांडारी
प्रकाशक : मिलिंद बेटावदकर, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी
पृष्ठसंख्या : ५६
मूल्य : ७५ रुपये

No comments:

Post a Comment