Monday, 19 September 2016

लोकवस्ती असलेले जगातील सर्वात मोठे बेट माजुली...!!!

दि. ११ सप्टेंबरच्या दै. 'मुंबई तरुण भारत'मधील माझा लेख...!
***
माजुली... कधीही न ऐकलेलं हे नाव आणि गाव भारताच्याच आसाममधलं. चर्चेत आलं कारण, माजुलीने ‘जगातील सर्वात मोठे नदीमधील बेट’ असा किताब पटकावला. मग काय, भारत सरकारनेही माजुलीला भारतातील पहिला बेटांचा जिल्हा म्हणून नुकतेच घोषित केले. त्यानिमित्ताने माजुलीची ओळख...
***
माजुली या आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात मानवी वस्ती असलेल्या बेटाला जगातील सर्वात मोठ्या बेटाचा दर्जा नुकताच देण्यात आला. ब्रह्मपुत्रेच्या विशाल पात्रात निर्माण झालेले हे बेट नदीच्या उगमापासून १,१०० कि.मी. व समुद्राला मिळते त्या बांगलादेशाच्या सीमेपासून ६३० कि.मी. अंतरावर आहे. याचा विस्तार १९५० पूर्वी म्हणजे फार मोठा भूकंप आला. त्या वर्षाआधी १,२५६ चौ.कि.मी. इतका होता. आता हे बेट नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणांमुळे आक्रसले असून केवळ ८८० चौ. कि. मी. जमिनीचा परिसर उरला आहे. दक्षिणेला ब्रह्मपुत्रा नदी आणि पुढे ब्रह्मपुत्रेलाच मिळणार्‍या उत्तरेतील खेरखुटिया खुटी नामक प्रवाहामध्ये हे बेट वसलेले आहे. तसेच येथील सुबनसिरी नदीदेखील खेरखुटीया खुटी नदीला मिळते.
जोरहाट हे जिल्हा मुख्यालय असलेल्या माजुली बेटावर जाण्यासाठी जलमार्गाने फेरी बोटीनेच जावे लागते. गुवाहाटी या आसामच्या राजधानीपासून जोरहाट येथे जाण्यासाठी आठ तासांचा वेळ लागतो. येथून पुढे बस किंवा रिक्षाने १३ कि. मी. दूर असलेल्या निमातीघाट नदीच्या घाटावर जावे लागते. त्यानंतर फेरी बोटीने पुढचा प्रवास सुरू होतो. बेटावर पोहोचण्यासाठी दीड ते दोन तासांचा अवधी लागतो. बर्‍याचदा बोटीवरच चहापान आणि नाश्त्याची सोय केलेली असते. बेटावर पोहोचल्यानंतर ब्रह्मपुत्रेच्या पात्रात वाळूमिश्रित मातीचा संचय होऊन तयार झालेल्या आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या नितांत सुंदर ठिकाणी आल्याची जाणीव होते. या बेटावर छोटी-छोटी दहा-बारा गावे आहेत. नारळ-पोफळीच्या बागा, वेळूची बने, मोठमोठ्या वृक्षांवर वाढलेली ऑर्किड, पाणथळीच्या जागेत केलेली भातशेती आणि पुरापासून संरक्षण व्हावे म्हणून खालचा भाग मोकळा ठेवून बांबूच्या आधारावर रस्त्याच्या कडेने बांधलेली वेताची घरे. असे हे माजुलीचे रुपडे क्षणात मन मोहवून टाकते. मात्र, ब्रह्मपुत्रेला पूर आल्यावर माजुली बेटाचा बराचसा भाग पाण्याखाली जातो. साहजिकच त्यामुळे पूरपरिस्थितीमध्ये गावकर्‍यांचा इतर गावांशी असलेला संपर्क तुटतो.
माजुली बेट हे अनेक स्थलांतरित आणि लुप्त होत चाललेल्या पक्ष्यांचे निवासस्थान आहे. हिवाळ्यात येथे तिबेट आणि सायबेरियातून अनेक स्थलांतरित पक्षी वास्तव्यास येतात. येथे येणार्‍या पक्ष्यांत ग्रेटर एडजुटेंट सारस, सायबेरियन क्रेन, हवासील या पक्ष्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. येथे पक्ष्यांच्या तब्बल २६० प्रकारच्या जाती आढळतात. जगभरातील किती तरी संशोधक, अभ्यासक या बेटावरील जैववैविध्याचा अभ्यास करण्यासाठी माजुलीला भेटी देतात. पावसाळ्यात येथे भरपूर पाऊस पडतो, निसर्ग नव्या नवलाईने फुलतो, विविध प्रकारचे जीव-जंतू, फुले आनंदाने बागडायला लागतात. याच काळात या बेटाचा जवळपास ५०-७० टक्के भाग पाण्याखाली जातो. मात्र, याचवेळी येथे बोटीने जाण्याची खरी मजादेखील अनुभवता येते.
माजुली बेट १६व्या शतकापासून आसामची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. नव-वैष्णव विचारधारेच्या प्रसारासही येथेच सुरुवात झाली. आसामी संत श्रीमंत शंकरदेव आणि त्यांचे शिष्य माधवदेव यांनी १५व्या शतकाच्या आसपास येथे सत्रांची स्थापना केली. सत्र म्हणजे धार्मिक प्रार्थनाघर, तसेच सांस्कृतिक संस्था होय. त्यांनी निर्माण केलेली अनेक सत्र आजही येथे अस्तित्वात आहेत आणि ती आसामी संस्कृतीचा महत्त्वाचा अंग आहेत. या सत्रांत प्राचीन आसामी कलाकृती, शस्त्र, भांडी, वस्त्र, दागिने आणि शिल्पकृती पाहायला मिळतात. यामध्ये कमलाबारी सत्र, उत्तर कमलाबारी सत्र, सामुगिरी सत्र, गरमूढ सत्र, आउनीआटी सत्र, बेंगेनाआटी सत्र, दक्षिणपाट सत्र महत्त्वाची आहेत.
नामघर या माजुली बेटावरील प्रमुख गावी येथील सर्वाधिक उत्सवांचे आयोजन केले जाते. येथील महत्त्वाचे उत्सव म्हणजे कार्तिक महिन्यात साजरा होणारा रास पौर्णिमा उत्सव. भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यावर आधारित या उत्सवात नृत्य-गायन सादर केले जाते. या वेळी आसामच्या गाव-शहरांसह आजूबाजूच्या राज्यातूनही पर्यटक-भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. वसंत ऋतूत येथे मिसिंग जमातीचा अली-आए-लिगांग आणि पोराग हा उत्सवदेखील येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
माजुली बेटावरील ४७ टक्के लोकसंख्या अनुसूचित जमातींची असून यात मिसिंग, देवरी, सोनोवाल-कछारी या प्रमुख जमाती आहेत. मिसिंग जमातीची लोकसंख्या जवळपास ४१ टक्के आहे. मिसिंग जमातीचे लोक सुरुवातीला ७०० वर्षांपूर्वी म्यानमारमधून अरुणाचलमार्गे येथे येऊन स्थायिक झालेले आहेत. या लोकांचे विशिष्ट लोकसंगीत, नृत्य आणि वाद्ययंत्रे आहेत. याचबरोबर माजुलीमध्ये कलिता, कोंच, नाथ, अहोम, मटक, ब्राह्मण, नेपाळी, बंगाली, मारवाडी आणि मुस्लीमलोकदेखील राहतात.
येथील प्रमुख भाषा म्हणजे मिशिंग, आसामी आणि देवरी होय. शेती हा प्रमुख व्यवसाय असलेल्या या बेटावरील लोक सुमारे १०० प्रकारच्या तांदळाचे पीक घेतात. येथील लोकांच्या आहारात तांदूळ आणि मासे यांचा समावेश असतो. मातीची भांडी तयार करणे, हातमागावरील कपडे तयार करणे, विणकामाच्या वस्तू तयार करणे, होड्या तयार करणे, मासेमारी आणि दुग्धव्यवसाय हेदेखील येथील लोकांचे प्रमुख व्यवसाय आहेत. पर्यटनासाठी वर्षभर योग्य असलेल्या माजुली बेटावर सप्टेंबर ते माचर्र् या कालावधीत येथील जैववैविध्य आणि निसर्गसौंदर्य पाहायला मोठ्या संख्येने पर्यटक येतात. येथे पर्यटकांना राहण्यासाठी आसामसरकारने निवासस्थान, धर्मशाळा, अतिथीगृह यांची उभारणीदेखील केलेली आहे. येथील काही सत्रदेखील पर्यटक, अभ्यासकांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देतात. माजुली बेटावर शैक्षणिक सुविधादेखील चांगल्या प्रमाणात उपलब्ध असून अनेक शाळा, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालये आहेत. परंतु येथे तांत्रिक शिक्षण देणार्‍या संस्था मात्र नाहीत. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी येथील विद्यार्थी आसामची राजधानी गुवाहाटी आणि अन्य मोठ्या शहरांत जातात.
- महेश पुराणिक

No comments:

Post a Comment