सध्या महाराष्ट्रात काही विकृत विचारांच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभुराजे आणि तमाममराठ्यांचा इतिहास नासवण्याचा एककलमी कार्यक्रमहाती घेतला आहे. परंतु, ज्या छत्रपतींमुळे आम्ही आज जिवंत आहोत, त्यांच्या इतिहासाचे होणारे विकृतीकरण आम्ही जागच्या जागी बसून पाहू शकत नाहीत. त्यामुळे अशा लोकांच्या कारस्थानी वृत्तीचा बुरखा फाडणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एक वादग्रस्त मुद्दा (जो याच विकृत लोकांनी केला आहे.) म्हणजे शिवरायांची गोब्राह्मणप्रतिपालक ही बिरुदावली. या समाजद्रोही मंडळींकडून या शब्दावरुन प्रचंड काहूर माजवले जाते आणि शिवराय कसे गोब्राह्मणप्रतिपालक नव्हते हे सांगण्याची अहमहमिका लागते. अशा लोकांकडे खरे तर लक्ष देऊ नये असे संतश्रेष्ठ तुकोबारायांनी शेकडो वर्षांपूर्वीच सांगून ठेवले आहे. तुकोबाराय म्हणतात,
‘‘तुका म्हणे भय न धरी माणसी!
ऐसीयाचे विषी करिता दंड!
तुका म्हणे सत्य सांगे!
येवोत रागे येतील ते!
गुण अवगुण निवाडा!
म्हैस म्हैस रेडा रेडा!
हा तो निवाड्याचा ठाव!
खर्या खोट्या निवडी भाव!
अंगे उणे त्याचे बसे टाळक्यात!
तुका म्हणे आम्ही काय करणे त्यासी!
धक्का खवंदासी लागतसे!
टाका तार्किकाचा संग!
पांडुरंग नित्य स्मरा हो !
भूंकती ते द्यावी भूंको!
आपण ते शिको नयें!‘‘
- जगदुरु तुकोबाराय
परंतु तुकोबाराय पुढे असेही म्हणतात की,
’’मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास|
कठीण वज्रास भेदूं ऐसे|
भले तरी देऊ कासेची लंगोटी|
नाठाळाचे माथी हाणू काठी|’’
***
आता आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया, गोब्राह्मणप्रतिपालक शिवाजी महाराज! येथे सर्वप्रथमआम्ही स्पष्ट करु इच्छितो की, सदर लेखाचा उद्देश सद्य काळातील ब्राह्मण जातीला श्रेष्ठ ठरविण्याचा अजिबात नाही. केवळ इतिहास वस्तुनिष्ठपद्धतीने मांडण्यासाठी हा लेखनप्रपंच आहे.
शिवभारतकार कविंद्र परमानंद आपल्या ग्रंथात म्हणतो, तसे ः ’प्रणिपत्य प्रवक्षामिमहाराजस्य धिमत:
चरितं शिवराजस्य भरतत्स्येव भारतम!’ अशी आमची भावना-धारणा आहे.
शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे, आमची अस्मिता आहे, आमचा स्वाभिमान आहे, आमचा मंत्र आहे. शिवाजी या नावाच्या केवळ उच्चराने अख्खा महाराष्ट्र एक होतो. तो होऊ नये म्हणून त्यांच्या नावावर जातीपातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न गेली कित्येक वर्षे सुरु आहे. शिवाजी महाराज हे गोब्राह्मणप्रतिपालक होते किंवा नाही हा वाद मुद्दामपुन्हा पुन्हा उकरून काढण्यात येतो, नि जातीपातीचे राजकारण केले जाते.शिवाजी महाराज खरेच गोब्राह्नणप्रतिपालक होते का? की ही ब्राह्मणांनी स्वत:साठी केलेली खेळी आहे? नक्की गौडबंगाल काय आहे हे? हे शोधण्यासाठीच केलेला हा अट्टहास आहे, अन्य काही नाही!
गोब्राह्मण प्रतिपालक म्हणजे नक्की काय?
छत्रपती शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक होते किंवा नाही हे पहायच्या आधी आपण गोब्राह्मणप्रतिपालक, गाय, ब्राह्मण म्हणजे नक्की काय प्रकार आहे हे समजुन घेऊया.
गो म्हणजे गाय ही हिंदुधर्मात पवित्र नि पुज्य नि अवध्य मानली गेली आहे. वेदांमध्ये १३९ वेळा गाईसाठी ’अघ्न्य’ म्हणजे अवध्य असा शब्द आला आहे. म्हणजेच वेदांत गोहत्या कुठेच नाही, तरीही काही दीडशहाणे वेदांतल्या काही श्लोकांचा चुकीचा अर्थ काढून वेदांत गोहत्या आहे असे प्रतिपादन करतात. त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रस्तुत लेखाचा विषय नि उद्देश नाही. त्यामुळे वेदांवरील टीकेचा विषय तुर्तास बाजूला ठेऊ.
वेदांमध्ये गायीला अवध्य, पवित्र आणि पूज्य मानले आहे आणि वेद हे हिंदुंचे आद्य-वंद्य-ग्रंथ आहेत. शिवाजी महाराज हिंदुपदपातशहा, हिंदु धर्मरक्षक, हिंदु धर्माभिमानी होते, त्यामुळे त्यांनी स्वतःला गाईंचे संरक्षक नि प्रतिपालक म्हटले तर त्यात पाप ते काय? पोटात गोळा यायचे कारण काय? अर्थात तुमच्या सेक्युलरी दृष्टीला मुस्लिमांची अतिकाळजी असल्याने तुमच्या पोटात दुखणार हे खरेच. गायीबद्दल तर डॉ. आंबेडकरांसारखा नास्तिक नि हिंदु धर्मावर टीका करणारी व्यक्तीदेखील गोहत्या करु नका असे त्यांच्या Untouchables - who were they या ग्रंथात सांगतात. आंबेडकर म्हणतात,
’’जर आपण गायींची हत्या केली तर आपण आपल्या कृषीविकासाशी तडजोड केल्यासारखे होईल. म्हणूनच की काय आपल्या पूर्वजांनी हेतु:पुरस्सर गोहत्येवर बंदी घातली होती.’’ परंतु सोयीपुरते आंबेडकरांचा वापर करणारे याकडे डोळेझाकच करतील.
आता ब्राह्मण म्हणजे काय हे पाहूया. (पुरोगामी-सेक्युलर-विकृतांचा आवडता विषय)
ब्राह्मण कोणाला म्हणावे याचे शास्त्रात जे संदर्भ दिले आहेत ते खालीलप्रमाणेः
’’यो ब्रह्म जानाति स ब्राह्मण:!
जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण!’’
म्हणजे जो प्रत्यक्ष ईश्वराला जाणतो, त्याचा अनुभव घेतो, त्याचा साक्षात्कार अनुभवतो किंवा तो जाणण्यासाठी काटेकोर नियमांचे पालन करतो तो ब्राह्मण! ब्रह्म जाणण्यासाठीच्या आचारसंहितेचे जो काटेकोर पालन करतो, तो ब्राह्मण!
समर्थांनी दासबोधात हेच सोप्या पद्धतींत सांगितले आहे,
’’करिती ब्रह्मनिरुपण! जाणती ब्रह्म संपूर्ण!
ते चि जाणावे ब्राह्मण! ब्रह्मविद्!’’
दशक ६.४.२४
हे ब्रह्मनिरुपण किंवा ब्रह्म जाणणे म्हणजेच आत्मज्ञान होय. समर्थ म्हणतात
’’जयांसि झाले आत्मज्ञान! ते चि थोर महाजन!
वेदशास्त्रे, पुराणे! साधु-संत बोलिले!’’
दशक - ६.४.१९
ब्रह्म म्हणजेच ईश्वरास जाणणे म्हणजेच आत्मज्ञान! ब्रह्म पर्यंत पोहोचून त्याविषयी म्हणजे विश्वामागच्या किंवा पलीकडील विश्वातीत रुपाची लोककल्याणार्थ उकल करणारे ते ब्राह्मण.
आता ही स्थिती प्राप्त होण्यासाठी काय गुणसंपदा किंवा आचारसंहिता आवश्यक आहे, ती श्रीमद्भगवद्गीतेत भगवंतांनी खालीलप्रमाणे सांगितली आहे,
’’शमो दमस्तप: शौचं क्षान्तिरार्जमेव च!
ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम!’’
शम, दम, तप, शुचिता, शांती, सरलता, ज्ञान, आत्मज्ञान आणि वेदांच्या प्रमाणत्वावर निष्ठा ही स्वाभाविक ब्रह्मकर्मे किंवा ब्राह्मणाचे गुणकर्म होय.
आता अशा समाजास मार्गदर्शक असणार्या आचारसंपन्न व्यक्तीचा आदर्श असणे वाईट काय आहे? अशा व्यक्तींचे संरक्षण करणे हे राजाचे कर्तव्य नव्हे काय? आजही आपण आपल्या समाजातल्या विविध स्तरांवरच्या लोकोत्तर पुरुषांची काळजी घेतो, मग ते वैज्ञानिक असोत किंवा समाजसुधारक असोत किंवा तत्वज्ञ किंवा कोणीही मार्गदर्शक असोत. आपण त्यांची सुरक्षा करतोच. त्यांना आजच्या भाषेत झेड प्लस सुरक्षा देतो मग ते कोणत्याही जातीचे का असेनात. मग शिवछत्रपतींनी त्याकाळी अशा विद्वान नि ज्ञानी नि चारित्र्यसंपन्न अशा काही ब्राह्मणांचे प्रतिपालन केले असेल तर त्यात बिघडले कुठे? याचे पाप ते काय? किंवा यात जातीयवाद तो काय? यात ब्राह्मणांची दादागिरी आहे काय?
(वरील सर्व विवेचन वेदांत-शास्त्रांत ब्राह्मण म्हणजे कोण, यावर आधारित आहे. सद्यकाळातील जन्मजात जातीव्यवस्थेत ज्यांची जात ब्राह्मण आहे, पण ते शास्त्रांत सांगितलेल्या निकषांत बसत नसतील, त्यांचा याच्याशी काहीह संबंध नाही, त्यांच्यासाठी गोब्राह्मणप्रतिपालक हा शब्द योजलेला नाही. त्यात मीही आलो.)
आता पुरावे, कारण हे या बिरुदावलीवर टीका करणारे पुराव्यांची मागणी नेहमीच करतात आणि ते दिल्यावर नाकरतातसुद्धा!
हो महाराज गोब्राह्मणप्रतिपालकच होते! हे घ्या पुरावे! ऐतिहासिक साधनांच्या सहाय्याने केलेला हा चिकित्सक प्रयत्न!
सर्वप्रथमआपण समकालीन पुरावे पाहु. ते खालीलप्रमाणे, छत्रपती शिवाजी महाराज ब्राह्मण प्रतिपालक असल्याचा पुरावा-
नलावडे नावाच्या नाईकवाड्याने प्रभावळी सुभेदाराच्या ब्राह्मण सबनिसाशी भांडण करून त्याच्यावर तरवारेचा हात टाकिला आणि अखेर आपलेच पोटात सुरी मारून घेऊन जीव दिला.
हे समजल्यावर शिवछत्रपतींंनी ८ सप्टेंबर, १६७१ च्या पत्रात सुभेदार तुकोरामयांस पत्र लिहिले. त्या पत्रात महाराज काय म्हणतात पाहा,
’’नलावड्याने मराठा होऊन ब्राह्मणावरी तरवार केली, याचा नतीजा तोच पावला.’’
संदर्भ - मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ८, क्रमांक २४ चे पत्र.
आता समकालीन नि विश्वसनीय अशा शिवभारतातले पुरावे-
शिवछत्रतींच्या इतिहास साधनांत शिवभारत हे समकालीन साधन असल्याने ते प्रमाण मानले जाते आणि या बाबतीत सर्व इतिहासकारांचे एकमत आहे. याचे कारण असे की, कविंद्र परमानंद नेवासकर या कवीने हे शिवचरित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने लिहिले. त्यामुळे हे शिवचरित्र शिवरायांनीदेखील वाचले असेलच. आणि जर त्यात काही वावगे लिहिले असते तर महाराजांनी नक्कीच त्याचा कडलोट केला असता, त्यामुळे शिवभारत विश्वसनीय मानले जाते. दुसरी गोष्ट हे शिवचरित्र जरी अफझल खानाच्या वधापर्यंत असले तरीही ते शिवछत्रपचींंच्या समोरच लिहिले गेले असल्याने अतिशय चिंतनीय आहे.
शिवभारतकार कवींद्र परमानंद हे सुरुवातीलाच म्हणतात की, आपण हे काव्य शिवाजी महाराजांच्या आज्ञेने लिहीत आहे आणि त्यांची विश्वासार्हता वारंवार प्रत्ययास आल्याने परमानंदांनी या ग्रंथात शिवजन्माची नि अफझलखान वधाची अशा फक्त दोनच तारखा दिल्या आहेत, ज्या इतर साधनांशी ताडून बघता अचुक जुळतात. यावरूनच परमानंदांना शिवचरित्राची जवळून माहिती असल्याचे खात्री पटते. अफझलखान प्रकरणात आणि आग्रा प्रकरणातही परमानंद शिवछत्रपतींंबरोबर होते, याचा पुरावा आहे. आता गोब्राह्मणप्रतिपालकत्वाचे त्यातले पुरावे सविस्तर पाहु-
’’देवद्विजगवां गोप्का दुर्दान्तयवनान्तक:!’’
(अध्याय १, श्लोक १५)
जो देव, द्विज म्हणजे ब्राह्मण आणि गवां म्हणजे गाईंचे रक्षण करणारा आणि दुर्दम्य यवनांचा काळ किंवा अंत असा (राजा शिवाजी)
’’देवानां ब्राह्मणानां च गवां च महिमाधिकम!’’
(३९ वा श्लोक)
देव ब्राह्मण आणि गायीचा महिमा याचे वर्णन आहे.
त्याकाळच्या स्थितीचे वर्णन करताना परमानंद म्हणतात,
’’न वेदा अप्यधीयन्ते नाभ्यर्च्यन्ते द्विजातय:!
म्लेंच्छधर्मो प्रवर्धन्ते हन्यते धेनवोSपि!’’
वेदांचे अध्ययन सुटले आहे नि ब्राह्मणांचा सत्कार बंद झाला आहे, म्लेंच्छधर्म वृद्धी पावत आहे आणि गाईंचीही हत्या घडत आहे.
(अध्याय -५, श्लोक - ४० ते ४२)
अफझलखान वधात परमानंद स्वत: शिवछत्रपतींबरोबर होते. त्या संपूर्ण प्रसंगाचे वर्णन करताना शिवछत्रपतींच्या मुखातले उद्गार सांगताना परमानंद म्हणतात,
’’सुराणां भूसुराणांच सुरभीणां च पालनम!’’
देवांचे, ब्राह्मणांचे आणि गाईंचे पालन करण्यासाठीच.
शिवभारतात आणखी अनेक ठिकाणी शिवरायांना उद्देशून परमानंदांनी गोब्राह्मणप्रतिपालक असा शब्द उच्चारला आहे. तरीदेखील काहीजणांना परमानंद ब्राह्मण असल्याने त्यांनी ते कपटाने लिहिल्याचे वाटत असेल तर आपण आणखी काही पुरावे पाहु-
आता प्रत्यक्ष परमप्रतापी छत्रपती श्रीशंभुराजे महाराजांबद्दल काय म्हणतात ते पाहु.
संभाजी महाराजांनी जे संस्कृत दानपत्र लिहिले आहे त्यातील पुरावे,
बाकरेशास्त्रींना दिलेले संस्कृत दानपत्र - दि. २४ ऑगस्ट, १६८०.
’’सुरुवातीला शंकराला नमस्कार, सदुरुला नमस्कार, ब्रह्मा विष्णु महेशांना नमस्कार, गंगा, सरस्वतीला नमस्कार! पद्मासनात जो स्थित आहे, कामकलास्तोत्र जो सहा प्रहर रोज पठण करतो, तो शंभुराजा असा मी-
शिवरायांचे वर्णन करताना शंभुराजे म्हणतात,
’’शिवराय हे शंकराचे अवतार, वेद, शास्त्र, स्मृति, आगम, पुराण यांचे जाणकार, जो सदाशिवस्वरुप आहे, देवब्राह्मणप्रतिपालक, सर्व देवालयांचे संरक्षण करण्यासाठी ज्याने आपला जीव खर्च केला, म्लेंछक्षयदीक्षित म्हणजे म्लेंच्छांना धराशायी ज्यांनी केले, ज्याने ताम्र नि तुर्क यांना जर्जर करून सोडले, कल्की अवताराप्रमाणे, हिंदुधर्माचा जीर्णोद्धार ज्याने केला, अफझलखानास बिचवा चालवला नि ज्याचे नृसिंहासमान शरीर रक्ताने माखले असा तो माझा पिता!’’
आता वरील शंभुछत्रपती स्पष्टपणे शिवरायांना देवब्राह्मणप्रतिपालक म्हणतात. आणखी काय पुरावा हवाय? तरीदेखील काहीजणांना अजुनही आक्षेप असेल (कारण जे शंभुराजे स्वतःच्या पित्याचे असे वर्षन करतात, त्यावरही आक्षेप घेणारे महाभाग या भूमीत निपजले आहेत)तर हे खालील पुरावे पहा-
शंभुराजेकृत बुधभूषणमआणि ब्राह्मण (बुद्धभूषण नव्हे तर बुधभूषण! नाही तर काही टाळके विचित्र उच्चार करण्यात पटाईत आहेत.)
पुन्हा एकदा हे सांगणे आवश्यक आहे की, ब्राह्मण हा कर्माने नि आचरणाने ब्राह्मण ठरतो, जन्माने नव्हे. म्हणून तर शंभुराजे स्पष्टपणे बुधभूषणमग्रंथात खालीलप्रमाणे सांगतात,
’’अष्टौ पूर्वाणि चिन्हानि नरस्य विनशिष्यत:!
ब्राह्मणान्प्रथमं द्वेष्टि ब्राह्मणश्चैव विरुद्ध्यते!’’
खालील ८ पूर्वखुणा माणसाचा नाश करतात-
१. ब्राह्मणांचा द्वेष करतो,
२. ब्राह्नणांना विरोध करतो किंवा त्यांच्याकडून अडविला जातो.
’’ब्राह्मणस्वानि चादत्ते ब्राह्मणांश्च जिघांसति!
रमन्ते निन्दया चैषां प्रशंसां नभिनन्दति!’’
३. ब्राह्मणांस दास्यवितो, संपत्ती काढून घेतो,
४. हिंसा करतो,
५. त्यांची निंदा करण्यात रस घेतो,
६. आणि त्यांची प्रशंसा ऐकल्यास आनंदित होत नाही.
’’नैतान्स्मरनति कृत्येषु याचितश्चाभ्यसूयति!
एतान्दोषान्नर: प्राज्ञो वध्ये बुद्ध्वा विवर्जयेत!’’
७. त्यांच्या उपकाराचे स्मरण ठेवत नाही
८. याचना करणार्यांचा तो मत्सर करतो.
आता बुधभूषणममधील हा पुढचा पुरावा ः अध्याय - ३, श्लोक १२ ते १४
’’दैवतेषु च यत्नेषु राजसु ब्राह्मणेषु च!
नियन्तव्य: सदा क्रोधो वृद्धबालातुरेषु च!’’
दैवदेवतांविषयी, राजांविषयी, ब्राह्मणांविषयी, वृद्धांविषयी, लहान मुलांविषयी आणि दुर्बलांविषयी राग नेहमी प्रयत्नपूर्वक काबुत ठेवावा.
’’ब्राह्मणेषु क्षमी स्निग्धेष्वजिह्म: क्षोभनोरिषु:!
स्याद्राजा भृत्यवर्गेषु प्रजासु च यथा पिता!’’
ब्राह्मणाविषयी क्षमाशील असावे, मित्र इत्यादी स्नेह्यांशी सरळ वागावे, शत्रुंविषयी क्रोधाने वागावे.
शंभुराजे स्वत:बद्दल म्हणतात,
धर्मपरंपरेने चालणार्या दाशरथी रामाप्रमाणे जो आहे, शिवयोग्याप्रमाणे ज्याने कपाळावर भस्म लावले आहे, द्विज आणि देवता यांचा आशिर्वाद, सदाचारी श्रेष्ठ ब्राह्मणाला जो दान, धन नि भूमी दान देतो, तो कोटी कल्पांतापर्यंत शिवलोकांत सन्मान पावतो.
यापेक्षा आणखी काय पुरावा हवाय?
आता काहीजण अजुनही आक्षेप घेतील की शिवरायांनी स्वत:ला गोब्राह्मणप्रतिपालक का म्हटले नाही? त्याला आमचे उत्तर-
कुणाचे नाव घेऊ नये याची शास्त्रात जी यादी आहे, त्यात स्वत:चे व गुरुचे नाव घेऊ नये, असे सांगितले आहे.
’’आत्मनामगुरोर्नामनामानि कृपणस्यच!
श्रेय:कामानु गृह्णय्यात ज्येष्ठापत्य कलत्रयो:!’’
मी मी म्हणु नये, थोडक्यात स्वत:चे कौतुक करू नये, गुरुचे नाव घेऊ नये, कंजुस माणसाचे नाव घेऊ नये, ज्येष्ठ पुत्राचे आणि बायकोचे नाव घेऊ नये असे शास्त्र सांगते.
शिवाजी महाराजांनी स्वत:ला कधी छत्रपती म्हणून फारसे मिरवले नाही. त्यामुळे ते छत्रपतीच नव्हते असे म्हणणे जसे मुर्खपणाचेच ठरेल तद्वतच स्वत:ला गोब्राह्मणप्रतिपालक असे मिरवणेही तितकेच अप्रस्तुत वाटते. पण तरीही वर उल्लेखिलेल्या नलावड्याच्या पत्रातून हे स्पष्ट होतेच आहे. याउपरही काहीजणांना शंका असेल तर अशा लोकांची विकृतबुद्धी त्यांची त्यांची त्यांनाच लखलाभ असो, हो आम्ही मात्र त्यांच्या विकृतीचा बुरखा संदर्भासहित फाडूच.
’’प्रौढप्रतापपुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधीश्वर, गोब्राह्मणप्रतिपालक, हिंदुपदपादशाह, हिंदवी स्वराज्य संस्थापक, हिंदुकुलभूषण, अखंडलक्ष्मीअलंकृत महाराजाधिराज श्रीमंत श्री शिवछत्रपती महाराज की जय!!!’’
(पुण्यात असताना नारायण पेठेतील पुणे मराठी ग्रंथालयात शिवभारत मिळाले होते, तेव्हा ते वाचले होते. -तुकारामचिंचणीकर, विवेकराव सोनावणे, शिवरामकार्लेकर, नितीन बाळपाटकी, राजेश महोश्वरी-)

No comments:
Post a Comment