Tuesday, 28 April 2015

झाले स्वप्न साकार शिवरायांचे...!



अपराजित योद्धा, मोगलांना सळो की पळो करून सोडणारा, छत्रपती शिवरायांचे स्वप्न साकार करणारा, जगातील सर्वश्रेष्ठ योद्ध्यांमध्ये अग्रणी असलेला, मराठा साम्राज्य पताका अटकेपार फडकावणारा एकमेव योद्धा म्हणजे श्रीमंत थोरला बाजीराव पेशवा... इतिहासाने आणि समाजानेही दुर्लक्षित केलेल्या अशा या युगपुरुषाचे कर्तृत्व गैरसमजामुळे नेहमीच झाकोळले गेले. पेशवाईत मस्तानीमुळे आणि नंतर ब्राह्मण असल्यामुळे...

आपल्या अजिंक्य युद्ध नीतीच्या जोरावर मोगलांच्या तोंडचे पाणी पळवणारा, कुशल सेनापती, छत्रपतींशी आयुष्यभर निष्ठा राखणारा बाजीराव, आज समाजाला, देशाला शिकवण्याची नितांत आवश्यकता आहे. मोगली बादशाहांच्या इतिहासाने पुस्तकांची पाने भरवनार्यांनी बाजीरावाला नेहमी बहुजन समाजापासून दूरच ठेवले आणि त्याला जातीमध्ये बंदिस्त केले. असे इतिहासकार खरे म्हणजे गुन्हेगारच होत. आपली संस्कृती, आपला राजा, आपला सेनापती यांचा इतिहास झाकून परकीयांचा उदो उदो करणाऱ्या इतिहासकारांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, ते सापाच्या पिल्लांची भलामण करत आहेत आणि यामुळेच या देशाचे नुकसान झाले आहे, होत आहे आणि जोवर याविरुद्ध कोणी बोलणार, लिहिणार नाही तोवर हे असेच सुरु राहील.

अवघ्या ३९ वर्षाच्या उण्यापुऱ्या आयुष्यात वयाच्या २० व्या वर्षापासून रणांगण गाजवणारा बाजीराव खरेच कोणी समजून घेतलाच नाही. थोरला बाजीराव पेशवा यांनी आपल्या कारकिर्दीत एकही लढाई हरली नाही, ते सदैव अजिंक्य राहिले. छत्रपती शिवरायांचे उत्तर हिंदुस्थान हिंदवी स्वराज्यात आणण्याचे स्वप्न होते, याच ध्येयासाठी बाजीराव लढला आणि त्याने ते ध्येय अटकेपार झेंडा रोवून पूर्णही केले. मुगलांवर मराठेशाहीचा दबदबा निर्माण करणारा आणि संधी असूनही छत्रपतीपद नाकारणारा थोरला बाजीराव पेशवा होय. आयुष्याच्या शेवटपर्यंत बाजीरावाने सातारच्या गादीशी इमान राखले.
आपल्याला माहिती असलेला अथवा सांगितला जाणारा बाजीराव म्हणजे मस्तानीचा बाजीराव असेच सांगितले जाते, त्यांच्या रंगेलपणाच्या गोष्टीच मीठ मसाला लावून सांगितल्या जातात आणि बहुजन समाजही त्याला माना डोलवत प्रतिसाद देतो, हे खरे म्हणजे दुर्दैवच होय. सतत २० वर्षे रणांगण गाजवणारा, शिवरायांनी दाखवलेल्या वाटेने जात, त्या वाटेचा महामार्ग करणारा बाजीराव, आपल्या पराक्रमाच्या जोरावर अवाढव्य मोगलांना पराभूत करणारा बाजीराव नेहमीच विस्मृतीत ढकलण्याचा प्रयत्न आतापर्यंत होत आला आहे.

बाजीराव-मस्तानीच्या प्रेमकथेवर अनेक लहान मोठ्या तर काही अतिरंजक कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. टीव्ही मालीकांमधुन, अनेक कथा, कादंबऱ्यामधून रंगेल व शौकीन म्हणून बाजीरावांचे वर्णनही आले. लोकांना खरा इतिहास कधीच आवडत नाही. काहीतरी रंजक, मनोरंजनात्मक कहाणी तयार करून चुकीचा इतिहास गळी उतरविला की बरे वाटते. असल्या रंजक कहाण्यांमधून  बाजीरावाच्या पराक्रमी प्रतिमेचं प्रचंड नुकसान झाले आहे. अजेय योद्धा बाजूला राहून एक प्रेमवेडा, स्त्रीवेडा पेशवा तेवढाच आपल्यापुढे मांडला जातो. मस्तानी हे बाजीरावांच्या आयुष्यातलं शृंगारिक पर्व जरी असलं तरी त्यावरून बाजीरावाला छंदीफंदी, रंगेल ठरवणे म्हणजे स्वतःच्या पूर्वजांचा पराक्रमी इतिहास पुसण्यासारखेच ठरेल. खरे तर मस्तानी-बाजीराव हे प्रेमाचे प्रतिकच. एका यवनी-मुसलमानी स्त्रीवर त्याकाळात प्रेम करून सहचारीणीचा मान देण्याचे धाडस ‘बाजीराव’च करू शकेल. परकीय देशातील ढोंगी व्हैलेण्टाइन डे साजरा करणाऱ्यांनी ही गोष्ट नक्कीच ध्यानात घ्यावी.

इतिहास:

जन्म   :  इ.स. १८ ऑगस्ट १७००     मृत्यू    :  इ.स. २८ एप्रिल १७४०

श्रीमंत बाजीराव पेशवे :
बाळाजी विश्वनाथ भट यांचा बाजीराव हा मोठा मुलगा. तर चिमाजी आप्पा धाकटा. आईचे नाव राधाबाई. बाजीरावांचे मूळ नाव विसाजी. मात्र, बाजीराव बल्लाळ व थोरला बाजीराव या नावानेही प्रसिद्ध होते. वयाच्या तेराव्या वर्षी काशीबाई नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला (१७१३). बाजीरावांना चार मुलगे झाले. त्यांपैकी नानासाहेब व रघुनाथराव हे पुढे प्रसिद्धीस आले. दुसरी पत्नी मस्तानीस समशेर बहाद्दूर नावाचा मुलगा झाला. समशेर बहाद्दूर पुढे पानिपतच्या लढाईत (१७६१) ठार झाला. आपल्या अवघ्या २० वर्षांच्या कारकीर्दीत बाजीरावांनी ४० महत्त्वाच्या लढाया केल्या.  त्यात माळवा (डिसेंबर १७२३), धर (१७२४), औरंगाबाद (१७२४), पालखेड (फेब्रुवारी १७२८), अहमदाबाद (१७३१) उदयपुर (१७३६), फिरोजाबाद (१७३७), दिल्ली (१७३७), भोपाळ (१७३८), वसईची लढाई (मे १७३९) या  मोठ्या लढायांचा समावेश आहे आणि विशेष म्हणजे सर्व लढायांमध्ये ते अजिंक्य ठरले.

थोरल्या बाजीरावांना पराभूत करणे त्यांच्या शत्रूला कधीही शक्य झाले नाही. हिंदवी स्वराज्य सैन्य, भिमथडीच्या तट्टांना नर्मदा, यमुनेचे पाणी पाजणारा बाजीराव हा पहिलाच योद्धा होय. बाजीरांवानी उत्तरेत घुसून गुजरात, माळवा, बुंदेलखंड जिंकून नर्मदा आणि विंध्य पर्वत यातील सर्व महत्त्वाचे व्यापारी मार्ग आपल्या ताब्यात घेतले. भविष्यात महाराष्ट्रावर परकीय संकट कोसळू नये म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर आपली सत्ता असायला हवी हे जाणून बाजीरावाने उत्तरेत शिंदे, होळकर, बांडे, पवार हे मराठा सरदार उभे केले. त्यामुळे ग्वाल्हेर, इंदौर, देवास आदी संस्थानं पुढे आली.

बाजीरावांचा हिंदुस्थानभर  मोठा दरारा होता. १७३९ मध्ये इराणचा बादशाह नादिरशाह याने दिल्लीवर आक्रमण केलं तेव्हा बाजीराव दिल्लीकडे निघाला. ‘बाजीराव निघालाय’ या एवढ्या बातमीनेच नादिरशाह याने दिल्ली सोडली आणि तो परतला.
॥ श्रीशाहूनरपति हर्षनिधान बाजीराव बल्लाळ मुख्यप्रधान॥
अशी बाजीरावांची मुद्रा होती.

कुशल सेनापती:
बाजीरावाच्या युद्धकौशल्याची जाणीव आपल्याकडे नाही. लष्करी डावपेच आणि रणनीतीच्या अभ्यासक्रमात आजही बाजीरावाने निजाम-उल-मुल्क याच्याविरुद्धची  १७२८ मध्ये पालखेड इथे केलेली लढाई अमेरिकन सैनिकांना शिकवली जाते. त्यासाठी पालखेडचं कायमस्वरूपी मॉडेलच तयार केलं गेलेलं आहे. बाजीरावाने निजामाला पूर्ण पराभूत करण्यासाठी त्याला पालखेडच्या कात्रीत कसं पकडलं याचा ‘स्ट्रॅटेजिक वॉरफेअर’च्या अभ्यासाचा भाग म्हणून आजही सांगितलं जातं. बाजीराव शत्रूला स्वत:च्या स्थळी आणून मात देत असे. मैदानात अनुकूल परिस्थिती नसेल तर वाट पाहून कसलेल्या शिकाऱ्याप्रमाणे हमला करायचा. कदाचित पुढील काळात या युद्धतंत्राचा विसर पडल्यामुळे ‘पानिपता’सारखा प्रसंग ओढावला.  बाजीराव हे मोठे युद्धनीतीज्ञ होते.  म्हणूनच ते अजेय राहिले. त्यांच्या कारकीर्दीतली एकही लढाई ते हरले नाही. म्हणून त्यांची तुलना नेपोलियनसारख्या युद्धनिपुण सेनापतीशी केली जाते. युद्धनीतीतील बारकावे, गनिमी कावे, शत्रूला आपल्या सोयीच्या व मोक्याच्या ठिकाणी आणून हरविणे, त्यासाठी दबा धरून बसणे, सक्षम गुप्तचर यंत्रणा वापरणे आदी तंत्र छत्रपती शिवाजीमहाराजांसारखेच वापरले असल्याचे दिसून येते. बाजीराव पराक्रमात शिवाजी महाराजांच्या बरोबरीचा होता की नाही याबाबत नक्कीच वाद नाही. शिवाजीमहाराजांच्या युद्धतंत्राचा ठसा बाजीरावांवर नक्कीच पडलेला होता.

घोडदळ ही बाजीरावांची सर्वात मोठी ताकद होती.  सहा फुट उंची असलेले बाजीराव हे उत्तम सेनापती होते. बुद्धी आणि शक्तीचा अद्वितीय संगम म्हणजे बाजीराव. घोड्यावरच्या बांधलेल्या  पिशवीत भाजलेले चणे घेऊन ते खात खात दौड करीत, सैनिकांसह प्रवास करी. त्यांच्यासोबतच राही. त्यांच्याबरोबर जेवण करत असे. त्याच्या फौजा ७५ किलोमीटर प्रतीदिन या वेगाने जायच्या. घोड्यावर मोजकीच शिधा व शस्त्र असल्याने मराठा सैन्याची गतिमानता जास्त होती. सैन्याचा अंतर कापण्यासाठीचा हा वेग त्या काळातला सर्वोत्तम वेग होता.  त्या काळात मुघल सैन्य दिवसाला ५ ते ६ मैल या वेगाने प्रवास करत असत. शत्रूला सुगावा लागायच्या आतच हल्ला झालेला असायचा. बाजीरावांची गुप्तचर यंत्रणा ही त्याची दुसरी मोठी बाजू. शत्रुच्या हालचालींबाबतची क्षणाक्षणांची माहिती त्यांना मिळायची. मार्गात येणाऱ्या नद्या, नद्यांचे चढ, उतार, पर्वत, घाट या सगळ्यांची अचूक माहिती असायची.

शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरून प्रतिकार करायला वेळच मिळायला नको हीच त्याची रणनीती आपण "मैदानी लढाई" लढून जिंकू शकतो हे मराठी सैन्याला जाणवून द्यायला कारणीभूत झाली. बर्नाड मॉन्टगोमेरी(Bernard Law Montgomery) या ब्रिटिश ’फील्डमार्शल’ने बाजीरावाची स्तुती पुढील प्रमाणे केली आहे - "The Palkhed Campaign of 1727-28 in which Baji Rao I, out-generalled Nizam-ul-Mulk , is a masterpiece of strategic mobility". उभ्या भारतात बाजीरावाच्या समशेरीचा डंका वाजत होता.

बाजीरावाचा उल्लेख छत्रसाल बुंदेला याने अशा प्रकारे केला आहे,
 "जग द्वै उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव। उन ढाई रजपुतियां, इन ढाई तुरकाव॥" - याचा अर्थ जगात २ ब्राह्मण नावाजले गेले. एक परशुराम ज्याने - उन्मत्त क्षत्रिय सत्ताधीशांना बुडविले, तर दुसरा बाजीराव पेशवा ज्याने तुर्कांची तीच स्थिती केली.
त्याने बाजीरावाकडे मदतीची मागणी करताना गजांत मोक्षाचा हवाला दिला आहे, तो असा, "जो गति ग्राह गजेंद्र की सो गति भई जानहु आज॥ बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज॥"  पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फ़ौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. आणि मोहम्मद खान बंगेश याचा पराभव केला.

मस्तानी :
बाजीरावाच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मस्तानी.  पेशवे दप्तरातील पत्रांवरून तिचे नावे मस्तान कलावंत होते व बाजीरावांच्या (नानासाहेब) लग्नसमारंभात तिला नाचगाण्यासाठी आणण्यात आले होते. तर निजामाच्या नाटकशाळेतून बाजीरावाने तिला आणली अशीही एक आख्यायिका आहे. महंमदशहा बंगशपासून मुक्तता केल्याने छत्रसालनेच तिला बाजीरावाला अर्पण केली असेही म्हणतात. परंतु बाजीरावाने सहकारिणीचा दर्जा देऊ केल्यानंतरही अनेक प्रसंगाना तोंड द्यावे लागले. मस्तानीसारख्या यवन स्त्रीवर प्रेम करून तिला शनिवारवाड्यात आणणारा म्हणून ब्राह्मणांनी या पेशव्याला उपेक्षितच ठेवलं. काही ब्राह्मणांनी तसेच घरातील नातेवाईकांनी मस्तानी प्रकरणावरून  त्यांना आयुष्यभर छळले. हिंदुस्थानभर आपल्या नावाचा धाक बसविणारा बाजीराव घरच्या कुरघोड्यांना तोंड देऊ शकले नाही. पुण्यातल्या तत्कालीन ब्राह्मणांना तसेच खुद्द बाजीरावांच्या आईला व बंधू चिमाजी अप्पांना ते काही पटले नाही. मस्तानीपासून  समशेरबहाद्दर नावाचा मुलगाही झाला.  .


जाता जाता:
१७२९ साली महम्मद खान बंगशाचा पराभव केल्यानंतर बाजीरावाचा दबदबा संपूर्ण उत्तर भारतात निर्माण झाला. मातोश्री राधाबाई यांची काशीयात्रेची इच्छा होती, बाजीरावाने राधाबाईंना काशीयात्रेला पाठवून दिले. परंतु उत्तर हिंदुस्थानात तर राजपुतांमध्ये स्पर्धा लागली की, राधाबाईंचे आदरातिथ्य करावे. परंतु या सगळ्यावर कळस म्हणजे जेव्हा महम्मद बंगशाला राधाबाईंनी बाजीरावाचे पत्र दिले तेव्हा तर तो आनंदाने नाचुच लागली की, बाजीरावाने माझी आठवण ठेवली म्हणून आणि त्यानेच पुढे राधाबाईंची काशीयात्रा पूर्ण केली. आपण कल्पनाही करू शकत नाही की राधाबाईंच्या जवळ सैन्य वगैरे नसतानाही शत्रूच्या सुभेदाराने बाजीरावाच्या मातेची काशीयात्रा पूर्ण करून त्यांना पुण्याला आणून सोडले. तो दगाफटकाही करू शकत होता, पण बाजीरावाचा पराक्रमाच असा होता की बंगशाने त्याच्या वाटेला जाण्याचे साहस केले नाही. ही फार मोठी गोष्ट होती.

अशा या वीराचा मृत्यू २८ एप्रिल १७४० रोजी नर्मदा नदीकाठी रावेर मुक्कामी झाला. शनिवार वाड्यासमोर असलेला बाजीरावाचा पुतळा सोडला तर त्याचे कुठेही भव्य स्मारक वगैरे नाहीये. जिथे त्याचा मृत्य झाला तिथे देखील त्याची समाधी मोठ्या हलाखीच्या अवस्थेत आहे. अफझलखानाच्या स्मारकाला विरोध न करणारे सरकार बाजीरावाचे प्रशस्त स्मारक कधी बांधेल का आणि त्याचा इतिहास शाळेपासून शिकवायला सुरु करेल का हाच खरा प्रश्न आहे.

काही ठळक घटना :
२० फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू
१८ आगस्ट  १७०० - बाजीरावांचा जन्म.
१७०७ - कैदेतून शाहूमहाराजांची सुटका.
बाळाजी विश्वनाथ - १७१३ ते १७२० पेशवाई प्रारंभ.
बाळाजी विश्वनाथ - १२ एप्रिल १७२० ला सासवड मुक्कामी अल्पशा आजाराने मरण पावले.
१७ एप्रिल १७२० ला शाहूमहाराजांनी पेशवाईची वस्त्रे बहाल केली
१७२८ निजामाविरुद्ध पालखेडची लढाई
२८ एप्रिल १७४० ला रावेरखेड येथे मृत्यू
१७ डिसेंबर १७४० चिमाजी आप्पा एदलाबाद येथे मरण पावला.

1 comment:

  1. We must pay tribute to this warrior Brahmin fighter like Bajirao Peshwa, but the sad thing is that a TV serial which was started had been withheld from display for want of sponsorship only for the reason that it was a historical story of Brahmin peshwa ruler. Just like our society has ostracized this great statesman on the basis of his caste. Such is the sad story of Brahmins living in Maharashtra. Brahmins are being hated and tortured in Maharashtra just as endangered caste.

    ReplyDelete