Friday, 24 April 2015

बहुजनांचा आधार परशुराम...!


परशुराम या विष्णुच्या सहाव्या अवताराबद्दल अनेक गैरसमज आणि आरोप विनाकारण समाजात जोपासले जात आहेत आणि काही समाजशांतीद्वेष्टे मुखंड याला वारंवार खतपाणी घालताना दिसत आहेत.
भगवान परशुराम हे ब्राह्मण ऋषी कुळात जन्माला आलेले थोर तपस्वी होत आणि त्यांनी क्षत्रियांचा संहार केला, त्यामुळे ते केवळ ब्राह्मण समाजाचेच देव व क्षत्रियांचे संहारक अशी त्यांची प्रतिमा काही भेदभाव पसरविणाऱ्या दुष्ट शक्ति वारंवार मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करतात आणि दुर्दैवाने आपलेच काही बांधव या भ्रमास खरे मानून प्रत्यक्ष भगवंताच्या अवतारास जातीत बंदिस्त करू पाहतात. खरे म्हणजे वर्ण व्यवस्था हा एक पूर्ण वेगळाच विषय आहे. जात म्हणून जो काही प्रकार सध्या अस्तित्वात आहे, त्यापेक्षा वर्णव्यवस्था निश्चितच वेगळी व्यवस्था होती.
भगवान विष्णूंचे जे विविध अवतार झाले त्याच्या मुळाशी जात किंवा तथाकथित जातीभेद, उच्च नीच भेदभाव असे काही कारण नसून केवळ अधर्माचा नाश, धर्म स्थापना आणि भक्तांवर कृपा हीच कारणे दिसतात.
कूर्म किंवा मत्स्य अवतारात – मनुष्यरुपात अवतार घेण्याऐवजी कासव आणि मत्स्य रूप हे पृथ्वी वाचविण्यास उपकारक ठरले होते. याशिवाय वेगवेगळ्या असुरांना दिलेल्या वरदानामुळे त्यांचा नाश होईल अशा रुपात भगवंत अवतार घेतात. नृसिंह अवतारात तर प्रभू केवळ खांबातून प्रकट झाले, तेही न मनुष्य न प्राणी अशा रुपात. अवतारांचे मूळ कारण बघितल्यास या सगळ्या कथांमध्ये (कुणी खऱ्या मानो वा न मानो) कुठल्याही जातीचे वर्चस्व निर्माण करण्याचा उद्देश मात्र मुळीच नाही. कारण, परमेश्वरास भेद हा कसा मान्य असेल.? परमेश्वर सर्वव्यापी असून लीला म्हणून काही देह धारण करतो, त्याने त्याचे सर्वव्यापित्व बदलत नाही. त्यामुळे परशुराम म्हणजे केवळ ब्राह्मणांचे देव असे म्हणणे म्हणजे सनातन संस्कृतीबद्दल अज्ञानाचे लक्षण आहे.

परशुरामावर केले जाणारे काही प्रमुख आरोप म्हणजे:
१) परशुरामाने स्वतःच्या आईची हत्या केली.
२) परशुरामाने २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली. एकदा क्षत्रिय नष्ट झाल्यावर पुन्हा कुठून आले.?
३) परशुराम क्षत्रिय द्वेष्टा होता.
४) परशुराम पृथ्वीवरील पहिला आतंकवादी होता.
५) कर्ण क्षत्रिय होता म्हणून परशुरामाने त्याला शाप दिला.
याची सविस्तर कारणमीमांसा खाली केलेली आहे.
१) परशुरामाने स्वतःच्या आईची हत्या केली.
भारत अथवा जगात सर्वत्र पितृसत्ताक संस्कृती अधिक काळापासून अस्तित्वात आहे. घर, कुटुंब, समाज, राज्यव्यवस्था या सर्व ठिकाणी पुरुषसत्ता आजही अस्तित्वात असलेली दिसते. परशुरामाचा कालखंड तपासून बघितला तर त्याकाळी देखील पुरुषसत्ताक पद्धती अस्तित्वात होती.
परशुरामाने आई रेणुकेचे शीर कापले याची कथा अशा प्रकारे सांगितली जाते की, ऋषी जमदग्नी यज्ञ कार्यासाठी बसले असता त्यांनी रेणुकेला  यज्ञासाठी पाणी आणण्यासाठी नदीवर पाठवले. परंतु नदीत चित्ररथ गंधर्व आपल्या स्त्रीयांसह जलक्रीडा करत असताना रेणुका तिथे मोहित होऊन निश्चल झाली व पाणी जमदग्नी ऋषींना देण्याचे विसरली. झाला प्रकार ऋषी जमदग्नींनी जाणताच ते क्रोधीत झाले. (ज्यांना यावर आक्षेप असेल त्यांनी आपल्या पत्नींनी असे कृत्य केले तर काय केले असते याचे उत्तर द्यावे) रेणुका पुन्हा आश्रमात आल्यावर त्यांनी पाचही पुत्रांना रेणुकेचे शीर कापण्यास सांगितले. परंतु चार पुत्रांनी त्यांची अवज्ञा केली. त्यामुळे ऋषींनी त्यांना निश्चल केले. परशुरामाने पित्याची आज्ञा मान्य केली आणि आईचे शीर धडावेगळे केले. आज्ञा मान्य केल्याने जमदग्नी ऋषींनी परशुरामाला वर मागण्यास सांगितले. तेव्हा आई रेणुका पुन्हा जीवित व्हावी आणि चारही बंधू पुन्हा चल व्हावेत असे वर परशुरामाने मागितले.
आता या कथेत आक्षेपार्ह काय आहे.? पूर्वीच्या काळी पितृआज्ञा ही प्रमाण मानली जाई. पित्याने केलेली आज्ञा मग ती चांगली असो अथवा वाईट तिचे पालन केले जाई. हा पुरुषसत्ताक संस्कृतीचा प्रभाव असू शकतो. रामाने देखील पितृआज्ञेचे पालन केल्याचे दिसते. त्याकाळी स्त्रीची योनिशुचिता हा प्रकार फार मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होता. स्त्रीने परपुरुषाकडे नजर वर करून पाहू नये असा दंडक होता. मग इथे तर रेणुका भ्रमामुळे केवळ त्या गंधर्वाच्या जलक्रीडा – प्रणयाराधणेकडे आकर्षित झाली होती, मोहित झाली होती. हा फार मोठा अपराध समजला गेला. (आजही जे यावर आक्षेप घेतील त्या तथाकथित बुद्धिवंत आणि विचारवंतांनी स्वतः आपआपल्या पत्नीसह दुसऱ्या पुरुषाची जलक्रीडा प्रणय क्रीडा खुशाल पहावी व काय वाटते ते समाजाला सांगावे.) आता मृत्युदंडच का या गोष्टीवर.? तर याचे उत्तर एकाच क्रोध. समाजात विविध स्वभावाची माणसे आपल्याला नेहमी दिसतात. काही माणसे छोट्याशा गोष्टीमुळे क्रोधाविष्ट होतात तर काही माणसे कितीही मोठी गोष्ट झाली तरी त्यांना अजिबात क्रोध येत नाही. जमदग्नी ऋषींची जन्मकथा पहिली तर त्यांच्या क्रोधाचे मुल त्यांच्या जन्मकथेत आहे. त्यामुळे परशुरामाला त्यांनी रेणुकेला मृत्युदंड देण्यास सांगितले.
परशुरामाने आज्ञापालन का केले, हे आधीच सांगितले आहे. ज्यांना आक्षेप असेल त्यांनी ५ – ५० वर्षापुर्वीचा काळ  आठवावा, वडिलांची आज्ञा घरातील सर्व पाळतच होते. कारण पुरुषसत्ताक पद्धती आणि पुरुष हाच घरातील कर्ताधर्ता असायचा.
२) परशुरामाने २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली. एकदा क्षत्रिय नष्ट झाल्यावर पुन्हा कुठून आले.?
भगवान परशुरामांचा जन्म हरिश्चंद्रकालीन विश्वामित्र ऋषींच्या नंतरचा मानला जातो. याच काळी क्षत्रियांच्या शाखा दोन कुळात विभागल्या गेल्या. एक सुर्यवंश आणि दुसरा चंद्रवंश. चान्द्रवान्शियांचे राज्य संपूर्ण भारतभर पसरलेले होते. हैहय अर्जुन  हा चंद्रवंशी होता. यांना यदुवंशी या नावाने देखील ओळखले जाते. महिष्मती नरेश कार्तवीर्य अर्जुन याच वंशाचे वंशज होत. भृगु ऋषि या चंद्रवंशाचे राजगुरू होते. जमदग्नी राजगुरू परंपरेने कार्तवीर्य अर्जुनाच्या दरबारात कार्यरत होते. परंतु अनीतीला विरोध करण्याच्या कारणावरून कार्तवीर्य अर्जुन आणि जमदग्नी ऋषी या दोघात मतभेत झाले. परिणामस्वरुप जमदग्नी महिष्मति राज्य सोडून निघून गेले. यावर रुष्ट होऊन कार्तवीर्य अर्जुन बहाणा करून अचानक जमदग्नी ऋषींच्या आश्रमात आला. ऋषि जमदग्नी आणि पत्नी रेणुकेने त्याचा आदर सत्कार केला. परंतु स्वैराचारी अर्जुन युद्धाच्या उन्मादात होता. कार्तवीर्य अर्जुनाने ऋषींची कामधेनु गाय चोरून नेली, आश्रम नष्ट केला. यावेळी अनेक ब्राह्मणांनी कान्यकुब्ज प्रदेशाचा राजा गाधी याचा आश्रय घेतला. परशुराम जेव्हा यात्रेवरून परत आले तर आई रेनुकेने झालेला अन्याय परशुरामाला सांगितला. या घटनेमुळे परशुराम क्रोधीत होऊन त्याने प्रतिज्ञा केली की हैहय क्षत्रिय वंशाचा मी सर्वनाश करील. या उद्दिष्टासाठी परशुरामाने पुढील  सामरिक रणनीतीला अंजाम दिला. दोन वर्ष सतत परशुरामाने अशा सूर्यवंशी आणि चंद्रवंशी राज्यांची यात्रा केली जे हैहय वंशीय राजांच्या विरुद्ध होते. वाणी चातुर्य आणि नेतृत्व दक्षतेमुळे अधिकाधिक चंद्रवंशी राजांनी आपले समर्थन परशुरामाला देऊ केले. आपल्या आपल्या सेना आणि शस्र्ते त्यांनी परशुरामाच्या सहय्यातार्थ दिले. तेव्हा या महायुद्धाची पार्श्वभूमी तयार झाली. यामध्ये परशुरामाला अवंतिका प्रदेशातील यादव, विदर्भाचे शर्यत यादव, पंचनद प्रदेशातील दृह यादव कान्यकुब्ज, कन्नौज येथील गाधीवंशीय, आर्यावर्त सम्राट सुदास सूर्यवंशी, गांगेय प्रदेशाचा काशिराज, गांधार नरेश मांधाता, अविस्थान – अफगाणिस्थान, मुजावत हिंदुकुश, मेरू पामीर, श्री – सिरीया, पराशुपूर  पारस फारस, सुसतर् -पंजक्षीर उत्तर कुरु –चीनी सुतुर्किस्तान- वल्क, आर्याण –र्इरान देवलोक बिहार तथा सप्तसिंधू प्रदेश, संथाल परगना ते बंगाल तथा आसाम पर्यंतच्या राजांनी परशुरामाचे नेतृत्व मान्य केले व या महायुद्धात सहभ घेतला. (हे सर्व क्षत्रिय होते). आणि उरलेल्या क्षत्रिय शाखा चेदि -चंदेरी नरेश, कौशिक यादव, रेवत तुर्वसु, अनूप, रोचमान यांनी कार्तवीर्य अर्जुनाच्या बाजूने युद्ध केले. या भीषण युद्ध कार्तवीर्य अर्जुन आणे त्याच्या कुळातील सर्व लोक मारले गेले. युद्धात अर्जुनाच्या बाजूने जे लढले त्यांचा समूळ नाश झाला. भारतवर्षातील हे एवढे मोठे युद्ध होते की परशुरामाने अहंकारी, उन्मत्त क्षत्रिय राजांचा विनाश करून लोहित क्षेत्र, अरुणाचल येथे ब्रहम्पुत्र नदी मध्ये आपला परशु धुतला. नंतर येथे पाच कुंड  बनवले गेले. जे आजही अस्तित्वात आहेत.
वाल्मिकींनी त्याला 'क्षात्रविमर्दन' न म्हणता 'राजविमर्दन' म्हटले आहे. यावरून असे स्पष्ट होते कि परशुरामाने सर्व क्षत्रियांचा संहार केला नाही तर केवळ अधर्मी क्षत्रियांचा सर्वनाश केला आहे. तसेच त्याने क्षत्रिय स्त्रियांना स्पर्श देखील केला नाही आणि ज्या स्त्रिया गर्भवती होत्या त्यांची संताने पुन्हा त्या वंशाचे प्रतिनिधित्व करू लागली.
कामधेनु चोरणे हा मुद्दा इतका मोठा अधर्म का ठरला आणि भगवान परशुराम क्रोधीत का झाले, याचाही विचार करणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीत गाय ही आई मानलेली आहे, केवळ एक प्राणी नव्हे मातेचा क्रय विक्रय होत नसतो. सहस्त्रार्जुनाने कामधेनु धनाच्या बदल्यात विकत घेण्याचा प्रयत्न आणि जमदग्नी ऋषींनी हे मानले नाही तर गायीचे हरण केले, गाय असहाय्य होती, दु:खी होती. तरीही केवळ सत्ताधारी असल्यामुळे आपण करतो ते योग्यच असे मानून अर्जुनाने हे कृत्य केले. (आजही सरकार काही गोष्टी संपादन करण्याचा प्रयत्न करेल तर त्याला जनता विरोध करते). जे हिंदू बांधव गायीना कसायांना केवळ अर्थ लोभामुळे विकतात, त्यांनीही हा इतिहास विचारात घ्यावा. सहस्त्रार्जुन पुत्रांनी मदांध होऊन ऋषीहत्येचे पातक केले. हा मुद्दा पुन्हा एकदा सांगतो जातीचा नाहीये. सत्तेत मदांध झालेले अनेक क्रूर राजे होऊन गेले आणि आजही असे राज्यकर्ते आहेत. राजाने प्रजेचे रक्षण पिता ज्याप्रमाणे पुत्रांचे रक्षण करतो, त्याप्रमाणे करणे हे राजाचे कर्तव्य आहे. पण जर राजाच भक्षक बनला तर प्रजेने काय करावे.? ज्या राजाच्या विश्वासावर प्रजा आनंदाने निश्चिंत राहते, त्या राजानेच त्या असहाय्य प्रजेवर अन्याय सुरु केला, लूट सुरु केली तर प्रजेने प्रतिकार करावा की करू नये.?
आज आपल्याला भ्रष्टाचाराविरुद्ध जी चीड आहे, ती का आहे.? ती जातीवर अवलंबून आहे की अन्यायाविरुद्ध आहे.?
भगवान परशुराम क्रोधीत का झाले आणि त्यांनी अधार्मिकांचा संहार का केला – याचे उत्तर आजच्या आपल्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या रागातच आहे आणि शासन करूनही सुधारणार नाही अशा पातळीवर जेव्हा अधर्म सुरु होतो तेव्हा अधार्मिकाचा संहार करावा लागतो आणि ज्या पद्धतीने भगवान परशुरामांनी अधार्मिकांचा संहार केला ते पाहता असे दिसते त्याकाळी खूप राजे मदांध झाले आणि म्हणूनच विष्णूंचा अवतार झाला.
३) परशुराम क्षत्रिय द्वेष्टा होता.
भगवान परशुराम हे क्षत्रियांचे शत्रू होते, असा जो भ्रम पसरविला जातो, तो पूर्णपणे खोटा आहे. रामायणात असे उल्लेख आहेत की ज्यावरून सिद्ध होते, परशुराम हे राजा दशरथ आणि राजा जनक यांच्याकडे नेहमी जायचे.
ते पण नेहमीच परशुरामाचे आदरातिथ्य करायचे आणि भगवान त्यांना आशीर्वाद ही द्यायचे. याचे स्पष्ट उदाहरण सीतास्वयंवर आहे, ज्यात अनेक राजे होते. जर भगवान परशुरामांनी सर्व क्षत्रियांना मारले असते तर हे सगळे राजे तेव्हा आनंदाने राज्य कसे करत होते.? पण प्रभू त्याच्यावर प्रसन्न होते कारण ते धर्मपूर्वक राज्य करत होते आणि प्रभू रामचन्द्रांशी भेट होईपर्यंत परशुरामांचे अवतारकार्य सुरु होते. अर्थात अधार्मिकांविरुद्ध युद्ध सुरूच होते. तरीही धर्मपूर्वक राज्य करणारे राजे तेव्हा होतेच.
महाभारतातील उल्लेखाप्रमाणे राजर्षी होत्रवाहन जे अंबेचे आजोबा होते, ते भगवान परशुरामांचे प्रिय सखा होते आणि स्वतः भगवान त्यांना भेटायला गेले होते. अंबेचे दुक्ख पाहून भगवान परशुरामांनी अम्बेस न्याय मिळावा म्हणून आणि तिचे दुक्ख दूर व्हावे म्हणून भीष्मांशी युद्ध सुद्धा केले होते.
ह्या सगळ्यातून मला हेच समजले की, परमेश्वर नेहमीच अधर्माविरुद्ध लढण्यास अवतार घेतो आणि आपल्यालाही अन्याय, अत्याचार व अधर्म यांच्याविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतो. याच भगवंताने ब्राह्मणकुळात जन्म घेतलेल्या परंतु अधर्मी असलेल्या रावणाचा वध केला, याच परमेश्वराने महाभारतात कौरवांचा संहार करविला. त्यामुळे परमेश्वर अधर्माविरुद्ध आहे, जातीचे बंधन त्याला नाही. तसेच अन्याय सहन करणारी अहिंसा ही अन्याय आणि अधर्म वाढविणारी आहे. त्यामुळे अन्याय व अधर्माचा प्रतीकार केलाच पाहिजे.
४) परशुराम पृथ्वीवरील पहिला आतंकवादी होता.
परशुराम हा केवळ आणि केवळ आततायी व द्युष्ट दुराचारी क्षत्रियांचा विरोधक होता. तसेच परशुराम हा समाज सुधारणा आणि जनतेला रोजगारक्षम बनविणारा  नायक देखील आहे. केरळ, कच्छ, आणि कोकण क्षेत्रात परशुरामाने समुद्रात बुडालेली शेतीयोग्य जमीन शेती कसण्यासाठी पुन्हा तयार केली, आणि पशूंच्या सहाय्याने जंगलांना दूर करून जमिनीला शेती कसण्यायोग्य करवली. कार्तवीर्य अर्जुन व हैहय वंश विनाशानंतर परशुरामाने समाज सुधारणेसाठी कृषी प्रकल्पांचे कार्य केले. केरळ, कोकण, मलबार आणि कछ या ठिकाणाची अशी भूमी समुद्रातून बाहेर काढली जी कृषी साठी उपयुक्त ठरू शकते. या वेळी  कश्यप ऋषी आणि इंद्र समुद्री पाण्याला बाहेर काढण्याच्या तंत्रात निपुण होते.  परशुरामाने याच क्षेत्रामध्ये परशूच्या सहाय्याने रचनात्मक कार्य केले. शुद्र समजल्या जाणाऱ्या लोकांना त्याने वने कापण्याच्या कामासाठी जुंपले आणि सुपीक जमीन तयार करून धान्याची पैदावर केली. याच शूद्रांना परशुरामाने शिक्षित व दीक्षित केले व त्यांना ब्राह्मण करवले. (वर्ण व्यवस्था जन्मावर नव्हे तर कर्मावर आधारलेली असल्याचे सत्य उदाहरण) तसेच त्यांना यज्ञोपवीत संस्काराने जोडले आणि त्याकाळी जे दुराचारी व आचरण हीन ब्राह्मण होते त्यांना शुद्र घोषित केले, त्यांचा सामाजिक बहिष्कार केला. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी हजारो युवक युवतींचा विवाह केला. परशुरामाच्या द्वारे अक्षय तृतीयेला सामुहिक विवाह केल्या जाण्याच्या कारणाने या दिवशी विना मुहूर्त पाहता विवाह करण्याची परंपरा आजही पाळली जाते.
परशुरामाचे अंत्योदयाचे प्रकल्प अनुकरणीय आणि अनोखे आहेत. ज्यांना रेखांकित करणे आवश्यक आहे. भगवान परशुराम यांचा काळ एवढा प्राचीन आहे कि त्याचे एकाएकी आकलन करणे अशक्य आहे.
५) कर्ण क्षत्रिय होता म्हणून परशुरामाने त्याला शाप दिला.
कर्ण आणि परशुराम यांची कथा महाभारतात येते. परशुरामाने केवळ ब्राह्मण युवकाला शस्त्र विद्या देण्याची प्रतिज्ञा केली होती. (भीष्म क्षत्रियाने  ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा केली म्हणून तो नपुंसक ठरत नाही) परंतु कर्णाने परशुरामाकडून ब्राह्मण असल्याचे खोटे सांगून विद्या ग्रहण केली. हे जेव्हा परशुरामाला समजले तेव्हा त्याने त्याला शाप दिला.
पूर्वीच्या काळी गुरु शिष्य यांतील नाते संबंध हे पारदर्शक असत. शिष्याने गुरुपासून कोणतीही गोष्ट लपवू नये असा सामाजिक संकेत असे. आजपासून १००-१५० वर्षापर्यंतही हा संकेत व्यवस्थित पाळला जात असे. गुरु पासून शिष्याने एखादी गोष्ट लपवली तर गुरु नाराज होई, क्रोधीत होत असे आणि शिक्षा करत असत. शाळेतील जुने दिवस आठवले तर यातील अर्थ कळेल. त्यामुळे कर्ण खोटे बोलला त्याची शिक्षा म्हणून परशुरामाने त्याला शाप दिला न कि तो ब्राह्मण नसल्याने दिला. त्यामुळे हा आरोप देखील निराधार आहे.

वरील घटनांवरून समजते की, परशुराम हा अन्यायाविरुद्ध लढणारा, गरीब जनतेला साहाय्य करणारा, कृषी संस्कृती व रोजगार संस्कृती वाढवणारा, आज्ञाधारक पुत्र, अधर्म संहारक असा युगपुरुष होता.
तो बहुजनांचा आधार होता शत्रू नव्हे. अपप्रचार करणाऱ्यांनी मेंदू असल्यासारखे बोलले, वागले, लिहिले तर चांगलेच. नाहीतर जनता जनार्दन  अशा नीच आणि ढोंगी, पाखंडी समाज कंटकांना त्यांचे थोबाड रंगवून त्यांची लायकी काय आहे ते दाखवल्याशिवाय  स्वस्थ नाही बसणार.
संदर्भ:
१. वाल्मिकी रामायण
२. व्यास कृत महाभारत
३. परशुराम - विजया जहागीरदार

9 comments:

  1. या वाक्याचा सन्दर्भ? (भीष्म क्षत्रियाने ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा केली म्हणून तो नपुंसक ठरत नाही)

    ReplyDelete
  2. jar parshuram vishnucha awtar hote tar tyana kahi garaj nhavti ki pitru adnya manun aaichi hattya keli? he kuthech basat nahi.Hatya hi hatya ch .jamdagni ruchina ka nahi jkeli shikhsha tyani.ki tyani stri hatyechi adnya mulala keli? he serv patat nahi manala.mhanun parshuramana koni manat nahi
    ani he atta sangun kahi upyog nahi

    ReplyDelete
    Replies
    1. yeshu pan devache messengar hote tari tyana tras jhala ka ?
      Paigambar pan devachech manus hote tari tyana tras jhala
      Shriramala pan tras jhala. sagle eka chutkitach karayla pahije hot ase mhanana ahe ka tujhe
      Tase tar mag mahabharat pan navta vhayla pahije

      Delete
  3. उत्तम माहिती.... पण निनावी आचरटांना तरीही प्रश्न पडतातच...

    ReplyDelete
  4. परशुरामाने केवळ ब्राम्हण युवकालाच शास्त्र विद्या देण्याची प्रतिज्ञा केली
    हे आपन मान्य करता आणि लेखाच शीर्षक बहुजन्नाचा आधार परशुराम ठेवता
    बनाव केलेला दिसयोय हा सर्व आपन
    ������������

    ReplyDelete
    Replies
    1. Bhishma he pan kshatriya hote tari pan tyana shashtra vidya parshuramanich dili mitra pudhe jevha yudhacha prasang ala bhisman barobar tevha tyani ti pratidnya ghetli

      Delete
  5. लेखन अभ्यासू आहे,
    परंतु एक (फुकटचा) सल्ला.

    संदर्भ म्हणून जे तीन ग्रंथ तुम्ही दिले आहेत, ते परंपरावादी आहे. वाल्मिकी रामायण असो किंवा व्यासांचे महाभारत असो. रामायण आणि महाभारत यांच्याकडे ऐतिहासिक चिकित्सेच्या दृष्टीने लिहिलेले दाजी पणशीकर यांचे 'महाभारत : एक सूडाचा प्रवास' हे पुस्तक नक्की वाचा. त्या ग्रंथाला प्रा. नरहर कुरुंदकर यांची प्रदीर्घ आणि अभ्यासपूर्ण प्रस्तावना आहे, तीही नक्की वाचावी.

    त्यानंतर 'परशुराम' या ऐतिहासिक व्यक्तीबद्दल आपले मत बनवणे, अशी माझी धारणा आहे. तुम्ही सुद्धा प्रयोग करून बघा. फायदा होईल.

    ReplyDelete
  6. So many questions by readers, but no answer from the blogger!
    Either lazy person or a person of limited knowledge or a person of a specific propoganda

    ReplyDelete