(हा लेख विस्ताराने लिहिलेला असल्याने बराच मोठा झाला आहे, परंतु ज्यांना समाजद्रोही मनोवृत्तीच्या पिलावळीन्चे कटकारस्थान हाणून पाडायचे असेल त्यांनी जरूर हा लेख वाचावा ही कळकळीची विनंती व आपल्या मागच्या आणि पुढच्या पिढीसह स्वतःची देखील बदनामीकारक हानी होण्यापासून रक्षा करावी, ही विनंती.)
तमाम महाराष्ट्राचे आराध्य दैवत क्षत्रिय कुलावतंस गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवराय आणि ब्राह्मण समाज यांबद्दल सध्या काही विषवल्ली विखारी प्रचार करत असून समस्त ब्राह्मण समाज शिवरायविरोधक असल्याचा भ्रम समाजात निर्माण करत आहेत. केवळ द्वेषाने भरलेली यांची भाषणे, सभा, संमेलने आणि पुस्तके असून त्यांना संपूर्ण समजही असाच द्वेषभावना जोपासणारा हवा आहे. केवळ याच ध्येयासाठी ही मंडळी काम करत आहेत. परंतु बहुजन समाजाने यांच्या अपप्रचाराला बळी न पडता सत्याचीच बाजू घ्यावयास हवी आणि या समाजकंटकांना त्यांची लायकी दाखवून द्यावी असे वाटते.
"परशुरामाने पृथ्वी नि:क्षत्रिय केल्यामुळे कलियुगात क्षत्रिय उरलेले नाहीत त्यामुळे ब्राह्मण आणि शुद्र हे दोनच वर्ण उरले आहेत, त्यामुळे शिवाजी महाराज हे शुद्र आहेत आणि शूद्राला राज्याभिषेकाचा अधिकार नाही" असा दावा करून छत्रपति शिवरायांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केला, त्यामुळे शिवरायांनी काशीहून गागाभट्ट पंडितला आणून राज्याभिषेक करवून घेतला.
हा खोडसाळ दावा आजपर्यंत प्रत्येकाने ऐकलेला-वाचलेला आहे, किंबहुना त्यावरून कितीतरी काळ ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांच्यात वादंग निर्माण झालेला आहे, परंतु असा वाद घालणारे ब्राह्मण किंवा ब्राह्मणेतर या दोघांनी या दाव्यात किती खरे आणि किती खोटे हे जाणून घेण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. त्यामुळे हा वाद महाराष्ट्रात सतत प्रज्वलित राहिला आणि खेडेकर-कोकाटे यांच्यासारख्या तापल्या तव्यावर पोळी भाजणाऱ्या लेखकांनी या दाव्याला अजून हवा देऊन बहुजनांच्या मनात ब्राह्मण समाजाविषयी एक अढी निर्माण केली, आणि बहुजनांनीदेखील काही शहानिशा न करता या दाव्यावर विश्वास ठेवून खेडेकर-कोकाटे यांना जे पाहिजे ते साध्य करून दिले.
पण यातून मिळाले काय? तर पिढ्यानपिढ्या निर्माण झालेला गैरसमज आणि त्याहून महत्त्वाचा म्हणजे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असा ब्राह्मणद्वेष, जो अजूनही महाराष्ट्रातल्या तरुणांच्या मेंदूत अक्षरशः धुमाकूळ घालतोय. आणि हाच ब्राह्मणद्वेष कमी करण्यासाठी प्रस्तुतचा लेख.
सर्वप्रथम शिवरायांच्या क्षत्रियत्वाची माहिती घेऊ -
सन १६५६ मध्ये शिवरायांनी चंद्रराव मोरे यांस लिहिलेल्या पत्रात महाराज म्हणतात, "राजे आम्ही, आम्हास श्रीशंभूने राज्य दिधले आहे". यावरून दिसून येते कि महाराजांना आपण राजे आहोत अर्थातच क्षत्रिय आहोत याची जाणीव याआधीपासूनच होती, पण त्यांना हे कळले कधी व कसे हे महत्त्वाचे आहे.
स्वतः शिवराय, त्यांचे कुटुंबीय (शहाजीराजे, बंधू संभाजी व जिजाऊसाहेब) व त्यांचे आप्तस्वकीय म्हणजेच अष्टप्रधान मंडळ यांना भोसले कुटुंबीय "सिसोदिया वंशीय राजपूत क्षत्रिय" असल्याचे अगदी पूर्वीपासूनच माहिती होते, याचा पुरावा मिळतो शहाजी राजांनी विजापूर दरबारला लिहिलेल्या पत्रात, एका मुस्लिम सरदाराने शहाजी राजांना राजपूत मानण्यास नकार दिला असता राजांनी त्या पत्रातून "आम्ही तो राजपूत" (आम्ही तर राजपूत) असे विजापूर दरबाराला ठणकावून सांगितले आहे, तसेच शहाजी राजांचा राजकवी 'जयराम पिंडे' याने "राधामाधवविलासचम्पू" या ग्रंथात शहाजी राजांना "सिसोदिया अवतंस" म्हणजे सिसोदिया वंशीय म्हटले आहे, आणि शिवरायांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे यांना त्याने "क्षत्रियगोत्री" असे विशेषण लावले आहे.
"राधामाधवविलासचम्पू" हा ग्रंथ जयरामने शिवरायांचे बंधू संभाजीराजे हे हयात असताना लिहिलेला आहे, साधारण सन १६५० अगोदर, याचा अर्थ असा होतो कि आपण शिवराय 'क्षत्रिय' कुळातले आहेत हे महाराष्ट्राला सन १६५० च्या अगोदर पासूनच माहिती होते, मग ऐन राज्याभिषेकाच्या वेळी एखादा ब्राह्मण त्यांच्या क्षत्रियत्वावर शंका कशाला आणि का घेईल?
यासंबंधी अजून एक पुरावा देता येतो, तो म्हणजे, 'कवी भूषण' याचा 'शिवराजभूषण' हा काव्यमय ग्रंथ, हा कवी भूषण सन १६६२ मध्ये स्वराज्यात आला, महाराज आग्र्याहून परत आल्यावर त्याने महाराजांच्या पराक्रमावर 'शिवराजभूषण' हा काव्यमय ग्रंथ रचण्यास सुरुवात केली, या ग्रंथात सुरुवातीलाच ४ थ्या ते १० व्या छंदात तो महाराजांच्या पूर्वजांचा इतिहास सांगतो, तो म्हणतो,
"सर्व पृथ्वीचे भूषण म्हणून सुर्यवंश प्रसिद्ध आहे…या वंशातील एका राजाने देवाला आपले सीस (शीर) अर्पण केल्याने त्यांच्या वंशाला 'सिसोदिया' असे नाव मिळाले…याच वंशात मालमकरंद (मालोजी) नावाचा पुरुष जन्मला…तो रणावर शिलेसारखा दृढ असल्याने त्याला 'भौंसिला' हे नाव मिळाले…त्याला पृथ्वीचे भूषण असा शहाजी नावाचा पुत्र झाला…" (मूळ ब्रज भाषा, इथे मराठी भाषांतर).
हा ग्रंथ सन १६६६ मध्ये रचण्यास सुरुवात झाली आणि सुरुवातीलाच भोसले कुटुंबाची वंशावळ सांगितली गेली आहे, म्हणजे पूर्वीचा पुरावा एखाद्याने अमान्य केला तरी या पुराव्यानुसार, शिवाजी राजे 'क्षत्रिय' कुळातले होते हे राज्याभिषेकाच्या किमान ८ वर्षे अगोदरपासून महाराष्ट्राला माहिती होते, मग तरीसुद्धा एखादा ब्राह्मण नेमका राज्याभिषेकाच्या आधी महाराजांच्या क्षत्रियत्वावर प्रश्न निर्माण करतो असे होणे पूर्णतः अशक्य आहे.
आणि म्हणूनच हे पुरावे ग्राह्य धरून आपण म्हणू शकतो कि शिवरायांच्या क्षत्रियत्वावर शंका घेण्यासाठी कोणत्याही ब्राह्मणाकडे कोणतेही कारण नव्हते, म्हणूनच महाराजांच्या राज्याभिषेकाला कोणत्याही ब्राह्मणाने विरोध केला नाही.
गागाभट्ट यांनाच राज्याभिषेक करण्यासाठी का बोलावण्यात आले?
पैठण येथे भट्ट घराणे नावाजलेले घराणे म्हणून ओळखले जात असे, १६ व्या शतकाच्या सुरुवातीस याच भट्ट घराण्यातील एक विद्वान गोविंदभट्ट हे काशीक्षेत्री स्थायिक झाले, तेथे त्यांच्या पिढीत गागाभट्ट यांचा जन्म झाला, त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले होते, तसेच काशीतील त्यांच्या घराण्याची सत्ता असलेल्या एका विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून गागाभट्टांची निवड झाली होती, यासोबतच काशीत भरवल्या जाणा-या विद्वतसभेत अग्रपूजेचा मानदेखील याच भट्ट घराण्याकडे होता. थोडक्यात, भट्ट घराणे हे आजच्या गांधी घराण्यासारखे अत्युच्च शिखरावर असलेले घराणे होते.
सभासद बखरीत गागाभट्ट यांचे वर्णन "कलीयुगीचा ब्रह्मदेव" असे आहे, त्यांनी "कायस्थधर्मप्रदीप" हा ग्रंथ लिहून कायस्थ हेसुद्धा क्षत्रियच आहेत याचा निर्वाळा दिला, ज्याअर्थी त्यांना "कलीयुगीचा ब्रह्मदेव" पदवी दिली गेली त्याअर्थी त्यांचे विचार हे सर्व ब्राह्मणांसाठी पूज्य आणि ग्राह्य मानले जाणे स्वाभाविक आहे.
कायस्थधर्मप्रदीप मधून त्यांनी कलियुगात क्षत्रिय आहेत हे दाखवून दिले होते, तसेच 'परशुरामाने पृथ्वी निःक्षत्रिय केली त्यामुळे ब्राह्मण व शुद्र हे दोनच वर्ण उरले' या दाव्यालादेखील सुरुंग लावला, मग अशा विद्वान व पूज्य व्यक्तीच्या मताला विरोध करून "कलियुगात क्षत्रिय उरलेच नाहीत" असा दावा करण्याची आणि तो सिद्ध करण्याची ताकद कोणत्याच ब्राह्मणात नव्हती. मग महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी महाराजांना या दाव्याद्वारे विरोध केला असे कसे म्हणता येईल?
अनंतदेव भट्ट हे गागाभट्ट यांचे बंधू पैठणला राहत असत, गागाभट्ट कोकणात सन १६६३ मध्ये आले होते, तेव्हा सन १६६४ च्या सुरुवातीस त्यांनी शिवरायांच्या आज्ञेवरून शेणवी जातींच्या लोकांच्या भांडणाचा निवाडा राजापुरात जाहीर सभेत करून दिला, त्यानंतर सन १६६९ ते १६७२ या काळात त्यांनी कायस्थ प्रभू जातीच्या लोकांचे निवाडेही करून दिले, महाराजांना त्यांच्याबद्दल बराच आदर होता, शेणवी जातीचा निवडा महाराजांना आवडला त्यामुळे त्या निवाड्यास महाराजांनी स्वतःहून प्रशस्ती (शिवप्रशस्ती) जोडली होती.
वरील सर्व कारणे, तसेच मूळ भट्ट घराण्याची महत्ता, हाती असलेले धार्मिक अधिकार, अत्युच्च विद्वत्ता व "परशुरामाने पृथ्वी निःक्षत्रिय केली" यासारख्या खोडसाळ दाव्यांना योग्य पुराव्यानिशी खोडून काढणे, तसेच मूळ पीठ काशी येथे या घराण्याला व खुद्द गागाभट्ट यांना असलेला मान यामुळे राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्याचा मान गागाभट्ट यांना देण्यात आला होता.
गागाभट्ट इसवी सन १६७३ ला नाशिकला आले, तेव्हा महाराजांना त्यांच्या आगमनाची वार्ता कळली, गागाभट्ट तेथून पैठणला अनंतदेव भट्ट यांच्याकडे गेले तेव्हा महाराजांनी त्यांना रायगडावर येण्याचे निमंत्रण पाठवले व येण्यासाठी पालखीची सोय केली, म्हणजे याचा अर्थ असा होतो कि गागाभट्ट हे स्वतःहून काशीतून महाराष्ट्रात आले होते, व इथे आल्यावर त्यांना महाराजांकडून बोलावणे आले होते, त्यामुळे गागाभट्ट यांना काशीहून बोलावले हे असत्य असल्याचे सिद्ध होते.
त्यानंतर गागाभट्ट सन १६७४ ला रायगडावर आले, तेव्हा त्यांना राज्याभिषेकाची कोणतीही कल्पना नव्हती मात्र भेटीत महाराजांनी त्यांना राज्याभिषेकाची कल्पना दिली, तेव्हा गागाभट्ट यांनी तिथी निश्चित केली व परत पैठणला आले, व तेथे त्यांनी राज्याभिषेकप्रयोग आणि तुलापुरुष दानविधी हे दोन ग्रंथ लिहिले व त्यानंतर राज्याभिषेकाची सिद्धता करण्यासाठी परत रायगडी आले.
जर गागाभट्ट यांना काशीमध्ये राज्याभिषेकाची बातमी कळली असती तर ते काशीहून तडक रायगडला आले असते व येतानाच दोन्ही ग्रंथ लिहून आणले असते, पण असे काही घडलेले दिसत नाही त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात पैठणला येईपर्यंत राज्याभिषेकाची कल्पना नव्हती हे सिद्ध होते.
ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला कि नाही?
"ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला" हा दावा कितीही राग निर्माण करणारा असला तरी त्यात काडीचेही तथ्य नाही, कारण तसा कोणताही पुरावा कोणत्याच ऐतिहासिक साधनात उपलब्ध नाही. विसाव्या शतकाच्या आधीच्या कोणत्याही ऐतिहासिक साधनात असा दावा केलेला दिसत नाही, २० व्या शतकाच्या आधी इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषातून शिवरायांच्या चरित्रावर प्रकाश टाकणारे बरेच साहित्य निर्माण झाले, त्यापैकी कोणत्याही साधनात अशाप्रकारचा दावा करण्यात आलेला नाही.
मग प्रश्न असा पडतो कि,
या वादाला सुरुवात नेमकी कोणी आणि कधी केली?
दुसरा बाजीराव पेशव्याच्या कारकिर्दीत मराठी राज्यात व मुख्यतः पुण्यात ब्राह्मणांचे प्रस्थ प्रचंड प्रमाणात वाढले होते तसेच तत्कालीन (आताच्या नाही) ब्राह्मणांना स्वतःच्या जातीचा दुराभिमान निर्माण होऊ लागला, व इतर सर्व जाती शुद्र आहेत असा घोर गैरसमज हळूहळू निर्माण होऊ लागला, गागाभट्ट यांच्यासारखा सुधारणावादी विद्वान यावेळी अस्तित्वात नव्हता. त्यामुळे या गैरसमजाला चाप बसू शकला नाही, परंतु खुद्द छत्रपतींना शुद्र म्हणण्याची हिंमत अजून एकाही ब्राह्मणात नव्हती. त्यामुळे मराठा साम्राज्य असेस्तोवर हा वाद कधी पेटू शकला नाही.
पुढे सन १८१८ साली मराठा साम्राज्य नष्ट झाले, अशातच १८३२ साली, सातारच्या प्रतापसिंह छत्रपतींना वेदोक्ताचा अधिकार नाही असा दावा एका (सर्व नाही) ब्राह्मणाकडून निर्माण केला गेला, तेव्हा महाराजांनी वेदपाठशाळेत यावर जाहीर चर्चा घेऊन त्या ब्राह्मणाचा संपूर्ण पराभव केला, त्यामुळे क्षत्रिय हे शुद्र नाहीत या वादाला तेथेच लगाम बसला.
परंतु इथे लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे,
'शिवाजी महाराज हे शुद्र होते' असा कोणताही दावा कोणत्याही ब्राह्मणाने केला नाही.
सन १८९६ साली सयाजीराव महाराजांच्या कारकिर्दीत या वादाने पुन्हा डोके वर काढले, महाराजांना त्यांच्या पुरोहिताने, "तुम्ही शुद्र आहात व तुम्हाला वेदोक्ताचा अधिकार नाही" असे सुनावले, तेव्हा महाराजांनी वेदोक्ताचाच आग्रह धरला, परंतु ब्रह्मवृंदाने तो मान्य केला नाही, यामुळे महाराजांनी त्यांची हकालपट्टी करून गुजराती-मारवाडी वगैरे देशावरच्या ब्राह्मणांना नेमून आपले क्षत्रियत्व सिद्ध करून वेदोक्ताचा आग्रह पुरा करून घेतला, त्यामुळे हा वाददेखील तिथेच शमला.
आणि इथेदेखील,
'शिवाजी महाराज हे शुद्र होते' असा कोणताही दावा कोणत्याही ब्राह्मणाने केला नाही.
परंतु, सन १८९९ साली राजर्षी शाहू महाराजांच्या कारकिर्दीत हा वाद पुन्हा उफाळून आला, आणि त्याने भयंकर रूप धारण केले, काही ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या 'वेदोक्त-क्षत्रिय नव्हे शुद्र' या वादाची जणू अंतिम लढाई असेच या काळाचे वर्णन करता येईल. सर्वांनी मिळून राजर्षी शाहू महाराज हे शुद्र आहेत व त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही असा दावा केला.
आणि याच काळात 'शिवाजी महाराज हे क्षत्रिय नसून शुद्र होते' असा अत्यंत चुकीचा दावा संपूर्ण इतिहासात सर्वात प्रथम याच काही ब्राह्मणांकडून मांडला गेला, आणि यासोबतच 'महाराजांच्या राज्याभिषेकाला तत्कालीन ब्राह्मणांनी विरोध केला म्हणून गागाभट्ट यांना लाच देऊन बोलावण्यात आले' ही अफवा जन्माला आली.
वास्तविक पाहता शाहू महाराज हे वेदांचे व वेदोक्ताचे अत्यंत चाहते होते, वेदाविषयीची आपली प्रीती त्यांनी वेळोवेळी आपल्या भाषणातून-लेखनातून दाखवून दिली होती, आर्यसमाजासोबत त्यांचे उत्तम संबंध होते, याची जाणीव ठेवूनतरी विरोधी ब्राह्मणांनी त्यांना वेदोक्ताचा अधिकार मान्य करणे गरजेचे होते, परंतु तसे झाले नाही आणि त्यामुळे त्यानंतर निर्माण झालेली अफवा कायमची ब्राह्मणांच्या कपाळी चिकटली.
हि अफवा ज्या विशिष्ट व्यक्तीने निर्माण केली ती व्यक्ती होती, कोल्हापूरचे शंकराचार्य "ब्रह्मनाळकर स्वामी",
इ.स. १९०३ मध्ये शंकराचार्यांनी महाड मुक्कामी, "शिवाजी क्षत्रिय नव्हताच. त्याने गागाभट्टाला लाच देऊन आपले क्षत्रियत्व मान्य करून घेतलं. त्याच्यामुळे शिवाजीच्या घराण्याचा सत्यानाश झाला." असे धादांत खोटे व बिनपुरावी उद्गार काढले.
आणि त्यांना प्रोफेसर विष्णू गोविंद विजापूरकर (करवीर ब्रह्मवृंदाचे तत्कालिन नेते) यांनी आपल्या ग्रंथमाला मासिकातील वेदोक्तप्रकरणावरील लेखातील विचार यातून पाठींबा दिला, त्यांनी लिहिले "शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक वेदोक्त पद्धतीने करून त्यांचा क्षत्रियकुलावतंस असा जयजयकार करणा-या गागाभट्टाला त्याच्या पातकाचं प्रायश्चित्त म्हणजे त्यास शौचकूपात पडून मृत्यू पत्करावा लागला."
आणि अशाप्रकारे छत्रपति शिवरायांचा, या दोघांकडून काहीही गरज नसताना वेदोक्त प्रकरणात समावेश केला गेला, त्यामुळे, ज्याअर्थी ब्राह्मणांनी शाहू महाराजांना वेदोक्त नाकारले त्याअर्थी त्यांनी शिवरायांनादेखील राज्याभिषेकाला नक्कीच विरोध केला असणार असा गैरसमज हळूहळू महाराष्ट्रात निर्माण होऊ लागला.
ज्याची परिणीती, "परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय केल्यामुळे कलियुगात क्षत्रिय उरलेले नाहीत त्यामुळे ब्राम्हण आणि शुद्र हे दोनच वर्ण उरले आहेत, त्यामुळे शिवाजी महाराज हे शुद्र आहेत आणि शूद्राला राज्याभिषेकाचा अधिकार नाही असा दावा करून छत्रपति शिवरायांच्या राज्याभिषेकाला महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी विरोध केला त्यामुळे शिवरायांनी काशीवरून गागाभट्टला आणून राज्याभिषेक करवून घेतला" या अफवेत-आरोपात झाली, ज्यायोगे ब्राह्मणांना वैचारीकदृष्ट्या लक्ष्य करण्याचे हत्यार खुद्द ब्राह्मणांच्या या दोघा नेत्यांनीच ब्राह्मण विरोधकांना मिळवून दिले.
परंतु, यात सर्वच ब्राह्मण शाहूंच्या विरुद्ध पक्षात होते का असा प्रश्न निर्माण होतो, तर त्याचे उत्तर नाही असेच देता येईल,
शाहूंना वेदोक्ताचा अधिकार नाकारणारे प्रा. विजापूरकर, शंकरशास्त्री गोखले, भाऊशास्त्री लेले, नारायणभट, राजोपाध्ये ई. ब्राह्मणच होते व या ब्राह्मणांच्या विरूद्धचे अर्थात शाहू महाराजांच्या बाजूचेही काही प्रमुख ब्राह्मणच होते, कृष्णाजी नारायण पंडित, सरन्यायाधीश विश्वनाथ बळवंत गोखले, सावळाराम अमृतराव विचारे ई.
सुरुवातीला लोकमान्य टिळक हेदेखील या वादात होते परंतु ५-११-१९०१ च्या केसरीत टिळक लिहीतात " …कोणास वेदोक्ताचा संस्कार करावयाचा असल्यास तो त्याने खुशाल करावा उगाच जातीजातीतील तंटे वाढवण्याची आमची इच्छा नाही व या विषयावरील दोन लेखात तशा प्रकारचा मजकूरही आलेला नाही. तेव्हा नसता दोष आमच्या माथी मारुन आम्हास भलत्याच वादात गोवण्याची कोणाची इच्छा असेल तर ती आमच्याकडून सफल होणार नाही..." याद्वारे टिळकांनी या वादातून अंग काढून घेतले,
तसेच आधी महाराजांच्या विरुद्ध असणारे राजोपाध्ये कर्झनला पाठवलेल्या पत्रात म्हणतात, "वेदोक्ताची चळवळ या नावाने कही उपद्य्वापी लोक समाजात विसरल्या गेलेल्या जातीय तेढी पुन्हा पेटवून स्वत:चा फायदा होतो का ते पहत आहेत. लावालाव्या करून चुकीचे अर्थ सांगून छत्रपतींचे मन कलुषित केले गेले आहे. राजांविषयी आदर राखुन मी सांगतो की याने अन्यायकारक सामाजिक बिघाड झाला आहे."
हिंदुस्तान सरकारच्या सेक्रेटरीला मुंबई सरकारचा सेक्रेटरी सी.एच.हिल याने ३ मार्च १९०५ ला एक पत्र लिहिले त्याचा भावार्थ,
"कोल्हापुरचे महाराज हे क्षत्रिय आहेत हे राजोपाध्ये पत्रातच म्हणत आहेत आणि ते तसे म्हणत नाहित असे म्हणण्याचा काहिंचा प्रयत्न या वादाच्या मूळाशी आहे. राजोपाध्ये ४ थ्या उताऱ्यात म्हणतात, मराठी राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या वेळेपासून कोल्हापुरचे राजघराणे क्षत्रिय असून त्यांना वेदोक्ताचा पूर्ण अधिकार आहे , त्यात कोणताही वाद नाही."
म्हणजे 'शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला हि केवळ एक अफवाच आहे जी केवळ एका शतकाआधी वेदोक्त प्रकरणातून निर्माण झाली व त्यामुळे शिवकालातील ब्राह्मणांवर नसता डाग लागला हे यातून स्पष्ट होते.
पुढे या वादावर पडदा पडून, याच शंकराचार्यांनी, राजर्षी शाहू महाराज हे क्षत्रिय असून त्यांना वेदोक्ताचे अधिकार असल्याचे मान्य केले, परंतु त्यांनी निर्माण केलेल्या अफवेवर मात्र ते पडदा पाडू शकले नाहीत व ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला हि अफवा उत्तरोत्तर पसरतच राहिली.
शिवकालातील ब्राह्मण व त्यांची मानसिकता -
शिवकालातील ब्राह्मणांची मानसिकता हि शिवरायांना विरोध करावा अशी खचितच नव्हती, किंबहुना ज्ञानाचे बहुसंख्य अधिकार हे त्यांच्या ताब्यात असल्याने त्यांचे स्थान जास्त कोणी हिरावून घेऊ शकत नव्हते त्यामुळे याला-त्याला विरोध करावा अशी मानसिकता त्यांची मुळीच नव्हती, झालेच तर अस्मानी सुलतानी संकटाने सर्वच हिंदू अगदीच पिचलेले होते, त्याला ब्राह्मण अपवाद कसे असतील? आणि विशेषतः ब्राह्मण हे धर्मप्रसारक-पुरोहित असल्याने त्यांना त्या काळात अनन्यसाधारण महत्त्व होते, प्रचंड मान होता, शिवरायांनी आपल्या अनेक पत्रात कुलदेवतेसोबतच गोब्राह्मणाची देखील आण घातली आहे हे याचे उत्तम उदाहरण आहे.
मुसलमानांच्या दृष्टीकोनातुन इथले बौद्ध, जैन, शिख, पारसी हे सर्व शत्रु म्हणजे काफीर होते. या सर्व समाजातील धर्माचा धागा जिवंत ठेवणारा जो "पुरोहितवर्ग" तो त्या काळातील आक्रमक मुसलमानांचा प्रमुख टार्गेट होता.
अर्थातच आजच्याप्रमाणेच त्याकाळीसुद्धा हिंदू धर्म हाच भारतातील प्रमुख आणि सर्वात मोठा धर्म होता, आणि हा धर्म टिकवून ठेवणारे, धर्माची व्यवस्थित माहिती असणारे लोक म्हणजे हिंदू धर्माचे पुरोहित अर्थात ब्राह्मणवर्ग. त्यामुळेच भारतातील मुसलमानी आक्रमकांच्या तलवारीच्या टोकावर सर्वप्रथम ब्राह्मण लोक होते हे ही याठिकाणी लक्षात घ्या, हिंदु धर्मामधे "धर्म" वाचवण्यासाठी आग्रेसर असलेला ब्राह्मणवर्ग असल्यामुळे या वर्गावर मुसलमान लोकांचा नेहमीच डोळा होता कारण धर्म टिकवून ठेवणार्या समाजाचे खच्चीकरण केले असता इतर लोकांचे खच्चिकरण व्हायला सोपे जाते हा मानसशास्त्राचा अगदी सुरवातीचा नियम आहे. थोडक्यात हिंदु धर्मियांचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठीचे मुसलमानांकडून जे प्रयत्न होत होते त्यामध्ये मुसलमानांद्वारा गोमांसभक्षण व ब्राह्मण समाजाची बाटवाबाटवी त्याचप्रमाणे मंदीरांची लुटालूट , जाळपोळ व मंदिरे उध्वस्त करणे अशाप्रकारची निति होती. ब्राह्मणाला बाटवणे हे त्यांच्यासाठी एक मोठे धर्मकार्य होते, आणि अशातच एखादा ब्राह्मण बाटला तर अजूनच अवघड व्हायचे. तो ज्याचा कुलोपाध्याय-कुलगुरू-पुरोहित असे त्यांच्यासाठी साहजिकच हा एक मोठा आघात असायचा, शिवाय जास्त कोणाला शुद्धीकरण विधी माहिती नसल्याने अजूनच कुचंबणा होत असे, कारण त्या ब्राह्मणाला स्वधर्मात परत येण्याचे सर्वच दरवाजे बंद होत असत.
अशा काळात जर एखादी व्यक्ती स्वतः त्या संकटांना सामोरे जाऊन रयतेचे रक्षण करत असेल आणि स्वतःला राज्याभिषेक करवून घेत असेल तर त्याला या ब्राह्मणांकडून विरोध होणे निव्वळ अशक्य आहे, किंबहुना राज्याभिषेक होण्याच्या अगोदरदेखील कायस्थांची व ब्राह्मणांची साथ महाराजांना नेहमीच लाभत होती, एखाद्या ब्राह्मणाने विश्वासघात करून स्वराज्य सोडले असे उदाहरण सापडत नाही. मोरोपंत पिंगळे, सोनोपंत डबीर, अण्णाजी दत्तो यासारख्या ब्राह्मणांनी स्वराज्यासाठी आणि महाराजांसाठी अक्षरशः जीव ओवाळून टाकला होता, सोनोपंत डबीर यांची तर महाराजांनी सुवर्णतुला केली होती, मग असे असताना, सर्व मान-मरातब आणि स्थैर्य मिळत असताना एखादा ब्राह्मण महाराजांना राज्याभिषेकासाठी विरोध करेल काय?
तसेच इंग्लिश फ्याक्टरी रेकॉर्ड्समध्ये अशी कितीतरी बातमीपत्रे आहेत ज्यातून दिसून येते कि राज्याभिषेकाच्या आणि शिवरायांच्या सामान्य हालचालींची बातमी खुद्द सरकारकुनांनासुद्धा नसे मग इतर सामान्य जन किंवा एखादा ब्राह्मण यांची काय कथा? हेन्री ओक्झीन्डेन हा इंग्रज प्रतिनिधी रायगडावर असताना, राज्याभिषेक नक्की कोणाचा होणार, शिवरायांचा कि त्यांच्या पुत्राचा? हेसुद्धा त्याला नीट माहिती नव्हते तसेच सिंहासन तयार होत होते याचीसुद्धा बातमी कुठे नव्हती, मग एखाद्या सामान्य ब्राह्मणाला याची माहिती कुठून मिळणार? तसेच रायगडावर फक्त कामापुरतेच लोक जात असत व परत पाचाडला मुक्कामास येत. गडावर फक्त किल्लेकारी मंडळी व महाराज नसले तर संभाजी महाराज व सरकारकून एवढेच लोक असत. ब्राह्मण भिक्षुकांची त्यावेळी गडावर किंवा पाचाडास वस्ती नव्हती, तेथे जेवढे लोक राहत ते नोकरदार मंडळींचे कुटुंबीय असत. आणि हे कुटुंबीय किंवा नोकरदार खुद्द महाराजांच्या विरुद्ध बोलतील अशी परिस्थिती त्यावेळी मुळीच नव्हती. त्यामुळे ब्राह्मणांनी महाराजांना जमावाने विरोध करणे हे केवळ अशक्य होते. राज्याभिषेकावेळी हजारभर ब्राह्मण जमवण्यासाठी महाराजांना दुरदुरच्या प्रांतातील ब्राह्मणांना बोलवावे लागले म्हणजे सामान्य ब्राह्मणांची संख्यादेखील फारशी नव्हती असे दिसून येते, आणि सोबतच त्यावेळी ब्राह्मण मंडळी मुलकी नोकर्यांच्या मागे असल्याने महाराजांना शुद्र संबोधून त्यांचा विरोध करणे हे ब्राह्मणांच्या शक्तीबाहेरचे काम होते. आणि म्हणूनच याद्वारेसुद्धा, संयुक्तिक कारण देऊन 'ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला नसल्याचे' सिद्ध करता येते.
महाराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी विरोध केला असे सांगणाऱ्या लोकांकडून एक तर्क मांडला जातो,
"राज्याभिषेक होण्याअगोदर स्वतःकडे राजेपद नसल्याने शिवरायांना ब्राह्मण आरोपींना-गुन्हेगारांना शिक्षा सुनावण्याचे अधिकार नव्हते, राज्याभिषेकानंतर मात्र हे अधिकार महाराजांना प्राप्त होतील व राजे आपल्याला शासन करतील हे ब्राह्मणांना माहिती होते, म्हणून ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला".
परंतु हा तर्क मांडणारयांना एक लक्षात येत नाही, महाराजांना हे अधिकार प्राप्त होण्यापूर्वी धर्मपीठाकडे हे अधिकार होतेच, त्यामुळे राजा नसला तरी तेथून मात्र गुन्हेगार ब्राह्मणांना शासन होतच होते, म्हणजेच राज्याभिषेक होण्यापूर्वी गुन्हेगार ब्राह्मणांना शासन होत नव्हते असे काही नाही. तसेच महाराजांना हे अधिकार प्राप्त झाल्यानंतरसुद्धा धर्मपीठाचे अधिकार संपुष्टात आले नाहीत, ते तसेच राहिले. म्हणजे धर्मपीठ चालवणारे ब्राह्मण महाराजांना विरोध करतील असे दिसत नाही. मग असा तर्क मांडणाऱ्या लोकांकडून हा तर्क कोणत्या आधारावर मांडला जातो?
महाराजांचे आदरस्थान राहिलेले समर्थ रामदास स्वामी यांनीदेखील कधी राज्याभिषेकाला विरोध केल्याचे दिसत नाही, ते स्वतः जरी उपस्थित नसले तरी त्यांचे शिष्य कल्याणस्वामी हे राज्याभिषेकाला उपस्थित होते, तसेच रामदासस्वामी हे महाराजांच्या मुंजीला उपस्थित असल्याची नोंददेखील मिळते . शिवरायांच्या काळात अनेक ब्राह्मण आणि त्यासोबत खुद्द महाराजांचे अष्टप्रधान यांच्यासाठीदेखील रामदास हे आदरस्थान होते असे दिसून येते. "श्रीमान योगी" आणि "जाणता राजा" या शब्दात वर्णन करणारे रामदास स्वामी राज्याभिषेकाला अनुकूल होते असेच दिसून येते, तुळजाभवानी देवीला उद्देशून ते म्हणतात, "तुझा तू वाढवी राजा, शीघ्र आम्हाची देखता". यावरून त्यांना हिंदूंच्या सार्वभौम राजाची आस लागलेली दिसून येते. मग ब्राह्मण जातीतील एवढा मोठा सत्पुरुषदेखील जर राज्याभिषेकाला अनुकूल होता तर इतर सामान्य ब्राह्मणांनी विरोध करण्याचे काहीही कारण सापडत नाही. यामुळे ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला नसल्याचे दिसून येते. आणि म्हणूनच ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केल्याचा कोणताही पुरावा सापडत नाही.
ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला असे सांगणार्यांकडून एका विदेशी साधनाचा पुरावा म्हणून वापर केला जातो ते साधन म्हणजे 'वेंगुर्ल्याच्या एका डच वखारकाराने १३ ऑक्टोबर १६७४ साली पाठवलेल्या पत्रातील चार ओळी'. हा वखारवाला लिहितो,
"…त्यांनी (पुरोहितांनी) त्याला (शिवाजींना) क्षत्रियत्वाचे अधिकार दिले व त्या जातीत बसवण्याची सिद्धता केली, पण त्याने (शिवाजींनी) ब्राह्मणी संस्कार आपणास करावे अशी मागणी केली, त्या विद्वान लोकांनी हि गोष्ट मात्र पूर्णपणे नाकारली, पण त्यांच्यातील मुख्याने तोही संस्कार विधिवत पूर्ण केला…" (मूळ इंग्रजी, इथे मराठी भाषांतर).
यातील "विद्वान लोकांनी ब्राह्मणी संस्कार नाकारले" याचा अर्थ काहीजण क्षत्रियत्व नाकारले असा घेतात, पण महाराजांचे क्षत्रियत्व आधीच मान्य झाले आहे, हे सुरुवातीच्या वाक्यातून लक्षात येऊ शकते. पण मग हे 'ब्राह्मणी संस्कार' (मूळ - Brahman Rule) म्हणजे नेमके काय असा प्रश्न उपस्थित होतो, तर, हे ब्राह्मणी संस्कार म्हणजेच 'मुंज'. शिवकाळात प्रामुख्याने धर्मसंस्कार लोप पावले होते. त्यामुळे मुंज हि बहुतकरून ब्राह्मणाचीच होत असे, परंतु शास्त्रानुसार मुंजीचा अधिकार ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य या तिघांनादेखील होता. परदेशी लोकांना याची माहिती असणे पूर्णतः अशक्य असल्याने या डचाने त्याची नोंद 'Brahman Rule' अर्थात 'ब्राह्मणी संस्कार' अशी केली आहे.
पण यातही पुढे, ब्राह्मणांनी मुंजीला नकार का दिला? असा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो, तर याचे कारण क्षत्रियत्व-शूद्रत्व हे नसून "वय (Age)" हे आहे, कारण महाराजांचे क्षत्रियत्व आधीच मान्य झाले होते हे या व्यापाऱ्याच्या सुरुवातीच्या नोंदीवरून दिसून येते, शास्त्रानुसार वयाच्या केवळ २१ व्या वर्षापर्यंतच मुंज करता येते, त्यानंतर नाही, मग तो ब्राह्मण असो कि क्षत्रिय, परंतु राज्याभिषेक होईपर्यंत म्हणजे वयाच्या ४४ व्या वर्षापर्यंत महाराजांची मुंज झालेली नव्हती आणि त्याकाळी ब्राह्मण कर्मठ असल्याने त्यांनी महाराजांच्या मुंजीला विरोध केला, परंतु गागाभट्ट या सुधारणावादी विद्वानाने त्यासाठी प्रायश्चित्त शोधून काढले आणि त्यांच्या पदामुळे इतर सर्व ब्राह्मणांनी ते मान्यदेखील केले, आणि यानंतर महाराजांची 'वेदोक्त' मंत्र म्हणून विधिवत मुंज करण्यात आली. या ठिकाणी लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, संभाजी महाराज किंवा राजाराम महाराज यांच्या मुंजीला मात्र विरोध करण्यात आल्याची नोंद या डच व्यक्तीने केलेली नाही कारण त्यांचे वय मुंजीसाठी अनुकूल होते.
म्हणजेच 'ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला नाही' असे परदेशी साधनाचा वापर करून सिद्ध करता येते.
वरील सर्व लेखाचा निष्कर्ष काढता, 'ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला' हा दावाच खोटा असल्याचे व असत्याच्या पायावर उभा असल्याचे दिसून येते. त्यामुळे हा दावा कितीही रंजक वाटला तरी तो खोटा आहे हे बहुजन समाजाने समजून घ्यावे व त्यावरून ब्राह्मणद्वेष करण्याचेदेखील सोडून द्यावे, कारण ब्राह्मणद्वेष करून ना बहुजनांना फायदा आहे ना ब्राह्मणांना, फायदा फक्त खेडेकर-कोकाटे यांच्यासारख्या आपल्या भावनांशी खेळणाऱ्या मंडळींनाच होतो, आणि म्हणूनच इतर समाजसुधारकांनी याबद्दल जास्त बोलणे थांबवलेले असले तरी हे जातीयवादी लेखक मात्र आपल्या द्वेषाच्या पुस्तकातून, भाषणांतून, सभा - संमेलनांतून सतत हे मांडत असतात आणि द्वेष निर्माण करत असतात हे बहुजन समाजाने समजून घेतले पाहिजे व त्याला अनुसरून अशी पुस्तके वाचणे थांबवले पाहिजे, यातच त्यांची उन्नती आहे हे निश्चित.
टीप -
मोरोपंत पेशवे यांनी राज्याभिषेकाला विरोध केला असे बर्याच जणांचे म्हणणे असते, परंतु यातदेखील काहीच तथ्य नाही, कारण तसा पुरावा-संदर्भ कोणत्याच ऐतिहासिक साधनात नाही, कोकाटे यांनी आपल्या ब्राह्मणद्वेषी पुस्तकातून हि अफवा पसरवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याविषयी न बोलणेच जास्त चांगले आहे.
जातीदंभ केवळ सनातनी ब्राह्मणांत होता असे मानण्याचे काही कारण नाही. सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी पंडितांची महासभा घेऊन सर्व मराठ्यांचे क्षत्रियत्व सिद्ध करून घेतले. पण मग त्यांनाही ही जातिश्रेष्ठत्वाची बाधा झाली. सर्व मराठे क्षत्रिय आहेत हे या पंडितसभेत मान्य झाल्यानंतर ते स्वतःस सिसोदे राजे भोसले असे म्हणवून घेऊ लागले आणि ग्वाल्हेरचे शिंदे, अक्कलकोटचे भोसले आणि बडोद्याचे गायकवाड यांना कुणबी म्हणून कमी लेखू लागले. "अलीकडे कुणबी वगैरे पैकेकरी होऊन या ज्ञातीत फितुर करून बाटवितात. (सोयरिका करतात) हे जाहल्यास धर्म राहणार नाही... हिंदुस्थानात शिंदे वगैरे कुणबी लोक आहेत त्यास ताकीद जाली पाहिजे... गायकवाडाची सोयरिक करू तरी कासीत मात्रागमन केल्याचे पातक" अशी छत्रपती प्रतापसिंहांची समजूत होती.
- या लेखासाठी जी पुस्तके वाचली आहेत तसेच जे ब्लॉग शोधले, वाचले आहेत, त्या सर्व ठिकाणचे संदर्भ काही काही वेळा जसेच्या तसे घेतले आहेत. केवळ सत्य-राष्ट्र-धर्मप्रचारार्थ आणि दंभ-ढोंग-पाखंडाच्या धिक्कारासाठीच याचा वापर केला आहे, कोणत्याही फायद्यासाठी याचा वापर केलेला नाही. तसेच त्या सर्व लेखकांचे मनःपूर्वक आभार, ज्यांच्यामुळे हा लिहिण्यासाठी मदत झाली.
संदर्भ:
<< http://vighnharta.blogspot.in/2013/06/blog-post.html >>
<< Tanmay Deshpande >>

खूप माहितीपुर्ण !
ReplyDeleteउत्तम माहिती पूर्ण लेख
ReplyDeleteअभ्यासपुर्ण लेख
ReplyDeleteबावळट सारख बरळणे बंद करा आणि सत्य मान्य करा
ReplyDeletekon bavlat ahe. Brigade?
DeleteUttam lekh,
ReplyDeletepan tumcha lekh vachunhi kahiche dole ughadat nahit, Zopeche song ghetlelyana jage karta yet nahi he kharech ahe
ReplyDeleteLihat raha asech. Brigedrupi Dukrana chikhalat lolava, tyanchi tich jaga ahe
ReplyDeleteSaheb, Shudra Mhanje kay. Kinwa Bramhan he 2 veg vegle prani aahet ka... konta navin shodh lavla aapan
ReplyDelete