Saturday, 12 November 2016

पाकप्रेमी नापाक मुखंड

दि. ०३ ऑक्टोबरच्या दै. 'मुंबई तरुण भारत'च्या अंकातील माझा वेध...!
***
पाकप्रेमी नापाक मुखंड

दहशतवाद्यांनी उरी येथे केलेल्या हल्ल्याचा हिशेब चुकता करण्यासाठी भारताने अवलंबिलेला मार्ग हिंसाचाराचा असून त्याचे समर्थन करणे योग्य ठरणार नाही. देशात जो काही हिंसाचार व युद्ध होत आहेत, बदला घेतला जात आहे तो योग्य नव्हे,’’ असे वक्तव्य मेधा पाटकर यांनी केले.सध्या देशात मानवाधिकाराच्या नावाखाली राष्ट्रभक्ती, राष्ट्राभिमान विकण्याचा बाजार मांडण्याला पेव फुटले असून यात पुरोगामी म्हणवल्या जाणार्या मुखंडांना भलताच भाव आला आहे. आपल्या देशावर कोणी हल्ला करो, युद्ध करो अथवा निरपराध्यांचे बळी घेवो, त्याचे काहीच सोयरसुतक या धेंडांना अजिबात नसते. अर्थात प्रस्थापित व्यवस्थेत ज्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात त्यांना युद्ध नको असते आणि देशाचीही काही फिकीर नसते. या लोकांच्या तोंडाचे बोळके आणि डोक्यातील मेंदू सदैव दगडफेक करणार्या, फुटिरतेची गरळ ओकणार्या आणि सीमेपलीकडून येणार्या शांतिदूतांचीच भलामण करण्यात व्यग्र असतो. यात जशी डावी मंडळी आघाडीवर आहेत, तसेच अनेक माध्यमवीर, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही आहेत, याच माळेतील नवा मणी म्हणजे मेधाताई पाटकर.
कथित नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या वगैरे असलेल्या आणि गुजरात सरकार, नरेंद्र मोदी यांना विरोध करणार्या मेधा पाटकर यांना नुकतीच पाकप्रेमाची भरती आली असून पाकिस्तानबाबत त्या कमालीच्या हळव्या झाल्या आहेत. मात्र ज्यावेळी पाकिस्तानी दहशतवादी भारतात येऊन बॉम्बस्फोट घडवतात, शेकड्याने निरपराधांचे बळी घेतात त्यावेळी ताईंची माया कुठे झिम्मा खेळत असते हे देव जाणे! पाकिस्तानकडून जवळपास गेली ७० वर्षे भारतावर अनेकानेक दहशतवादी हल्ले झाले. समोरासमोरच्या युद्धात तर आपण त्या देशाला चारी मुंड्या चित केले परंतु, जो दहशतवाद त्या देशाने भारतात गेली पंचवीसेक वर्षे निर्यात केला, त्या विरोधात भारताने एकदाच जोरदार तडाखा दिला तर इथली तथाकथित पुरोगामी वगैरे मंडळी बिथरली आहेत. यामागचे गौडबंगाल ते काय? मेधाताईंच्या म्हणण्यानुसार हिंसाचाराचा मार्ग अवलंबणे समर्थनीय नाही, हे बरोबर! पण ते अर्धसत्य आहे. भगवद्गीतेतही ’धर्महिंसा तदैव च’ असे सांगत अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध केलेला प्रतिकार न्याय्यच असल्याचे म्हटलेले आहे. यामुळे जर समोरचा देश इतर कुठल्याही मार्गाने हिंसेवर निर्बंध घालू शकत नसेल, निरपराध्यांचे बळी घेणे थांबवत नसेल, आपल्या सार्वभौमत्वालाच आव्हान देत असेल आणि त्या देशाला हिंसेचीच भाषा समजत असेल तर त्याला त्याच्या भाषेतच नव्हे तर दुप्पट आक्रमकतेने धोबीपछाड देणे योग्य नाही का?
***
देशहित प्रथम

उरी हल्ल्याचा बदला म्हणून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानची अवस्था सर्जरी झालेल्या रुग्णासारखी झाली आहे, पाक अजूनही कोमात आहे, असा टोलाही संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पाकिस्तानला लगावला. या पार्श्वभूमीवर ’युद्धच नको’चे मिळमिळीत धोरण काय कामाचे? आज भारत जगभरात पाकिस्तानला चहूबाजूंनी कोंडीत पकडण्याचे प्रयत्न करीत असताना आणि सीमेवरही जशास तसे उत्तर देत असताना सर्वच भारतीयांनी सरकारच्या मागे ठामपणे उभे राहण्याची गरज आहे, परंतु मेधाताई पाटकर, सीतारामयेचुरी यांच्यासारखी शत्रूराष्ट्रसहिष्णु मंडळी यात खोडा घालण्याचे कामकरतात, किंबहुना चर्चा-शांतिवार्तेची मागणी करत त्याच त्या शिळ्या कढीला ऊत आणतात. अर्थात त्यांच्या मताला राष्ट्रभक्त समाजात काडीचीही किंमत नसली तरी शत्रू देश मात्र अशा लोकांच्या शोधातच असतो. यातून स्वकीयांविरुद्ध बोलणारा विध्वंसक प्रचारक त्यांना आयता उपलब्ध होतो, जे देशहिताच्या दृष्टीने घातकच ठरते.
इतिहास काळापासून भारताला जी शौर्यशाली वीरांची परंपरा लाभली ते पाहता, अगदी विद्यारण्य स्वामींनी यादव बंधूंत चेतवलेल्या राष्ट्रभक्तीच्या स्फुल्लिंगापासून ते छत्रपती शिवरायांपर्यंत सर्वांनीच राष्ट्रविरोधी ताकदींना नेस्तनाबूत करण्याचेच धोरण स्वीकारल्याचे स्पष्ट होते, ज्यामुळे आज हे राष्ट्र स्वाभिमानाने आणि ताठ मानेने उभे आहे. या शूरवीरांनीही मानवाधिकार वगैरे थिल्लर गोष्टींचा आधार घेत राज्य केले असते तर हा देश केव्हाच परकीयांच्या घशात गेला असता. आताही भारताने आपल्या शत्रूविरुद्ध लढाऊ बाणा दाखवत उरी हल्ल्याचा जबरदस्त बदला घेतला, अशावेळी देशहिताच्या आड येणार्या झारीतील शुक्राचार्यांना सरकार आणि देशातील जनतेने कवडीइतकेही महत्त्व न देणेच उचित ठरेल. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे वक्तव्यही याबाबत महत्त्वपूर्ण आहे. ’’पाकिस्तान जर बदलला नाही आणि युद्ध करण्याची वेळ आली तर मलाही सीमेवर जायचे आहे. पाकिस्तानने काही केले तर चोख प्रत्युत्तर दिलेच पाहिजे’’, असे त्यांनी म्हटले आहे, जे योग्यच आहे.
दुसरीकडे मेधा पाटकर या केवळ उरी हल्ल्याचा बदला घेणे योग्य नव्हे असे म्हणून थांबल्या नाहीत तर त्यांनी भारत सरकारने सिंधू नदी पाणी कराराचा पुनर्विचार करू नये अशीही मागणी केली, जी सर्वथा चुकीचीच! कारण शत्रू देशाला शक्य असेल त्या त्या सर्व मार्गाने ठेचणे आणि स्वदेशातील नागरिकांच्या हक्काचे, देशाच्या सीमेचे रक्षण करणे हेच सरकारचे प्रधान कर्तव्य असते. त्यामुळे पाकिस्तानसारख्या कुरापतखोर आणि नाठाळ शेजार्याला वठणीवर आणण्यासाठी लहानात लहान आणि मोठ्यात मोठे असे सर्व प्रयत्न करणे सर्वस्वी देशहिताचेच असते. यामुळे सिंधू नदी पाणी कराराचा पुनर्विचार करणे अथवा तो रद्द करण्याचा निर्णय घेणे सरकारला भाग पडते. त्यामुळे त्याला मानवता अथवा इतर गोंडस आणि छानछोकी नावांनी विरोध करणे हे निर्बुद्धतेचेच लक्षण समजायला हवे पण जे स्वयंघोषित बुद्धिमंत आहेत, त्यांच्या हृदयाच्या शिडात देशभक्तीची हवा कशी काय वाहणार?

- महेश पुराणिक

No comments:

Post a Comment